<
महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना ५० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रति
बंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले होते.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर-घाडगे यांच्या आदेशान्वये पथकाने त्यांच्या राहत्या घराची झाडाझडती घेताना ८५ लाखांची रोकड व ३२ तोळ्यांचे ‘धन’ बघून पथकही अवाक् झाले. धनगरांच्या घरात प्रचंड मोठे घबाड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले आहे.
नाशिक शहरासह जिल्हा सध्या लाचखोर सरकारी लोकसेवकांमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. वर्ग-३ किंवा ४ सह आता चक्क वर्ग-१ व २चे अधिकारीसुद्धा लाच घेताना पथकाच्या हाती लागत आहे.
काही दिवसांपुर्वीच जिल्हा उपनिबंधक सतीश भाऊराव खरे यांना ३० लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. या आतापर्यंत मोठ्या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली असताना मनपाच्या महिला शिक्षणाधिकारी संशयित सुनीता धनगर यांनीही ५० हजारांची लाच स्वीकारली असता पथकाने त्यांना रंगेहात जाळ्यात घेतले. या दोन मोठ्या कारवायाने शहरात लाचखोर लोकसेवक अधिकाऱ्यांविषयी चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, वालावलकर यांनी धनगरांच्या घराची झडतीचे आदेश दिले असता पथकाने त्यांचे उंटवाडी येथील ‘रचित सनशाइन’ नावाच्या घरात धडक दिली.
घराची झाडाझडती घेताना तब्बल ८५लाखांची रोकड घरात आढळून आली आहे. धनगरांनी इतक्या मोठ्या संख्येने नोटांचे बंडल घरात साठवून ठेवल्याचे बघितल्यानंतर पथकातील कर्मचाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.