<
मराठी साहित्य मंडळातर्फे पुरस्कारांची घोषणा
जळगाव (प्रतिनिधी) : येथील प्रथितयश वकील मुकुंदराव जाधव यांच्या ” मनाच्या नजरेतून” या काव्यसंग्रहाबद्दल मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेतर्फे त्यांची सावित्रीबाई फुले साहित्य भूषण राजस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात त्यांना सातारा जिल्ह्यातील कराड येथे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
अखिल भारतीय साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेतर्फे निवडक प्रस्तावामधून ॲड. मुकुंदराव भाऊराव जाधव यांच्या “मनाच्या नजरेतून” या काव्यसंग्रहाची निवड झाली आहे. त्याकरिता त्यांची सावित्रीबाई फुले साहित्य भूषण राजस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सदर पुरस्कार जाहीर झाल्याबाबतचे पत्र जेष्ठ साहित्यिक डाॅ. जयप्रकाश घुमटकर, जेष्ठ कवयित्री ललिता गवांदे, जेष्ठ लेखिका नीलिमा जोशी, मराठी साहित्य मंडळाच्या प्रदेश सचिव वर्षा थोरात यांनी नुकतेच ॲड. मुकुंदराव जाधव यांना दिलेले आहे.
ॲड. मुकुंदराव जाधव हे मुळचे पातोंडा, ता. चाळीसगांव येथिल रहिवासी असून गेल्या २३ वर्षापासून जळगाव येथील जिल्हा न्यायालयात वकीली व्यवसाय करीत आहे. “मनाच्या नजरेतून” हा काव्यसंग्रह २६ फेब्रुवारी २०२३ रोजी जळगांव येथे प्रकाशित करण्यात आलेला आहे. सदर पुरस्कार ऑक्टोबर महिन्यात सातारा जिल्ह्यातील कराड शहरात होणा-या राजस्तरीय काव्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याचे मराठी साहित्य मंडळाच्या प्रदेश सचिव वर्षा थोरात यांनी कळविले आहे.