परवा सकाळी साधारण ७ वाजता मॉर्निंगवॉक साठी बाहेर पडलो. सिग्नलपाशी रस्ता क्रॉस करण्यासाठी पेडेस्ट्रियनचा सिग्नल हिरवा झाला आणि मी क्रॉस करण्यासाठी चालू लागलो. डावीकडून स्कूटरस्वार आपल्या ९-१० वर्षाच्या मुलाला शाळेत सोडायला जात होता. जवळ जवळ माझ्या अंगावर धडकला. मला म्हणाला “दिखता नाही क्या?” मी त्याला फक्त बोटाने सिग्नलचा लाईट दाखवला. तर तो म्हणाला “स्कूल को लेट हो रहा है” असं बोलून भुरकन निघून गेला. त्यावरून मला एक सुचलेली कल्पना पुढे मांडतो, पटत असेल तर आपल्या परिचितांना शेअर करावी आणि शाळाशाळांतून अंमलात आणावी.
शाळांमध्ये दर महिन्यातून एक दिवस एक “डिसिप्लीनचा” तास ठेवायचा. त्या तासामध्ये शिस्त आणि त्याचे महत्व मुलांना सांगायचे. वरच्या उदाहरणानुसार त्या मुलाने आपल्या वडिलांना सांगायचे “बाबा, मला शाळेत उशीर होत असेल तर तुम्ही काय कोणाचा जीव घेणार का? याठिकाणी तुम्ही चूक केली आहे आणि त्याची शिक्षा म्हणून आज मी जेवणार नाही”. आजकाल लोकांकडे पैसा फार जास्त झाला आहे. शंभर – दोनशे रुपये दंड ट्रॅफिक पोलिसच्या तोंडावर फेकून ते पुढे जातात. बरेचदा हे लोक नजरेतून सुटतात आणि दंड बिंड काहीही भरावा लागत नाही. अशावेळी त्यांचा मुलगाच एका बालपोलीसचे काम करू शकेल आणि आपल्या जबाबदारीची जाणीव वडिलांना करून देऊ शकेल. आपल्या मुलाला रस्ता क्रॉस करतांना कोणी धडक दिली तर काय वाटेल? “बाबा, तुम्ही असा सिग्नल तोडून कोणाचा जीव धोक्यात घालता, अशी वेळ माझ्यावरही येऊ शकते. मलाही कितीतरी वेळा एकट्याला रस्ता क्रॉस करावा लागतो, तुम्हालाही करावा लागतो आणि माझ्या आजी – आजोबांनाही. मग तुमच्यासारखी बेजबाबदार स्कूटर इतर कोणी चालवली तर? हे होऊ नये म्हणून तुमच्या चुकीची शिक्षा मी स्वतःलाच करून घेणार”
हे तास शाळांमधून घेण्याचा महत्वाचा उद्देश म्हणजे एकाच ठिकाणी असे हजारो ‘बाल – पोलिसांना’ आपण संपर्क करू शकतो आणि त्यामुळे हा विषय प्रभावीपणे घराघरात पोचवू शकतो. अशा तासांमध्ये असंख्य विषय अंतर्भूत करता येऊ शकतात. रस्त्यात थुंकणे, उगाचच हॉर्न वाजवणे, रस्त्यावर कचरा टाकणे, प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर, रांगेत उभे असताना मधेच हात घालून आपले काम करण्यासाठी घाई करणे वगैरे कितीतरी विषय आहेत. प्लास्टिकचा फक्त एक ६ x ६ इंचाचा तुकडा मुंबईतील प्रत्येक व्यक्तीने रस्त्यावर फेकला तर त्याची लांबी जवळजवळ तीनहजार किलोमीटर, म्हणजे कन्याकुमारी पासून दिल्ली पेक्षाही जास्त होते. म्हणजे एवढ्या लहानशा बेपर्वाईने आपण एका दिवसात किती मोठ्या भागावर प्लास्टिकचे आवरण घालतो? मग हे प्लास्टिक रस्ते, नाले, मेनहोल, गटारांची झाकणे ब्लॉक करतील नाहीतर काय? महापूर आला, त्यात इतकी माणसं मृत्युमुखी पडली यात नवल काय? आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेतो आहे. घरात मोरी तुम्बायला नको म्हणून आपण कचरा झाडून वेगळा करत नाही का? तोच जर बाथरूममध्ये ढकलून दिला तर काय होईल? निसर्गाला दोष देण्याआधी आपण कुठे चुकतो ते बघा. यासाठीही बालपोलीस फार महत्वाची भूमिका बजावू शकतील. आपल्या आईवडिलांबरोबर बाहेर फिरायला गेले असताना हे बालपोलीस सतर्क राहतील आणि आपल्या वडीलधार्यांना काबूत ठेवू शकतील. साम – दाम – दंड – भेद यापेक्षा ही बालपोलीस यंत्रणा अधिक यशस्वी होईल.