<
जळगाव दि.29 – राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने प्राध्यापक डॉ. निलेश दिपकराव जोशी यांच्या “ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीयांची यशोगाथा” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी शिल्पा पाटील, (पोलीस निरीक्षक, रामानंद नगर), जळगाव, गुरुदत्त चव्हाण, (जिल्हा क्रीडा अधिकारी), जळगाव, राजेश जाधव( सचिव, जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स संघटना), ॲड. प्रमोद पाटील (सचिव, केसीई सोसायटी), प्राचार्य डॉ. अशोक राणे, प्रा. संदीप केदार(जनसंपर्क अधिकारी केसीई सोसायटी), डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर ( शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक), आणि डॉ. रणजीत पाटील उपस्थित होते. मेजर ध्यानचंद यांची जयंती दर वर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून संपूर्ण भारतभर अत्यंत उत्साहात साजरी केली जाते. याच दिनाचे औचित्य साधून एकलव्य क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा प्रकाशन सोहळा पार पडला.
या पुस्तकास के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध शारीरिक शिक्षणतज्ञ प्रा. डॉ. मकरंद जोशी (छत्रपती संभाजीनगर) यांनी या पुस्तकास प्रस्तावना दिलेली आहे. शारीरिक शिक्षण आणि क्रीडा हि एक स्वतंत्र अभ्यासशाखा म्हणून उदयास आल्याचे आपल्याला दिसून येते. एकविसाव्या शतकात या क्षेत्राला अनन्य साधारण असे महत्व प्राप्त झाले. भारत सरकारने देखील अनेक योजना क्रीडा क्षेत्रासाठी सुरु केलेल्या आपल्याला आढळून येतात. याचाच परिपाक म्हणून एकविसाव्या शतकात आपल्याला बहुसंख्य ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू मिळाले आहेत. या पुस्तकात सन १९०० ते २०२० या कालावधीतला भारताचा ऑलिम्पिक स्पर्धेतील विजयी प्रवास शब्दबद्ध करण्यात आलेला आहे. यातून अनेक होतकरू खेळाडूंना प्रेरणा मिळेल. तसेच क्रीडा क्षेत्रातील कार्य करणाऱ्या संघटक, प्रशिक्षक, पंच अधिकारी यांनाही उपयुक्त अशी माहिती मिळेल. शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमातील एक अत्यंत महत्त्वाच्या भागाविषयी विद्यार्थ्यांना या पुस्तकाच्या माध्यमातून माहितीचा खजिना मिळेल.
या कार्यक्रमास उपस्थित खेळाडू, पालक व मान्यवरांनी लेखकाचे अभिनंदन करून भविष्यात अशा स्वरूपाच्या लिखाणासाठी शुभेच्छा दिल्या.