<
पुणे-(प्रतिनिधी) – राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीतील समाजकार्य महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रकरणांबाबत चर्चा करण्याकरिता समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांचे तर्फे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स (मास्वे) संघटनेला सोमवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी बैठकीकरिता बोलावण्यात आले होते. समाजकल्याण आयुक्त, महाराष्ट्र राज्य, श्री ओम प्रकाश बकोरिया यांचे सोबत झालेल्या बैठकीत “मास्वे” चे संस्थापक अध्यक्ष प्रा अंबादास मोहिते यांच्या नेतृत्वात “मास्वे” च्या शिष्टमंडळाने मंत्रालय, आयुक्तालय, प्रादेशिक उपायुक्त व सहायक आयुक्त स्तरावरील प्रलंबित असलेल्या प्रकरणांबाबत सविस्तर चर्चा केली. समाजकार्य प्राध्यापकांना सेवांतर्गत प्रगती योजना (कॅस), सेवानिवृत्त शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण लाभ, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना, डीसीपीएस व जीपीएफ ची खाती उघडणे, सातवा वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती व थकबाकी, नियमित वेतन, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या शासन निर्णयात सुधारणा, एमफील-पीएचडी अर्हताधारक शिक्षकांना पदोन्नती लाभ, वैद्यकीय खर्चाची प्रलंबित देयके, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणे व नियुक्तीस मान्यता, परिविक्षा कालावधी समाप्ती, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या, गुणवत्ता हमी कक्ष व महाराष्ट्र कौन्सिल ऑफ सोशल वर्क एज्युकेशन चे गठन, शासनाच्या विविध विभागातील संबंधित पदांवर समाज कार्य पदवीधारकांची नियुक्ती, समाजकार्य महाविद्यालयांची मान्यता आदि प्रश्नांबाबत झालेल्या चर्चेत आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेत जिल्हा, विभाग व आयुक्त समाज कल्याण, पुणे स्तरावरील प्रलंबित प्रकरणे दिनांक २५ सप्टेंबर पर्यंत निकाली काढण्याचे तसेच मंत्रालय स्तरावरील प्रश्नांचा तातडीने पाठपुरावा करण्याचे “मास्वे” च्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले.
बैठकीला सहआयुक्त भारत केन्द्रे, सहायक आयुक्त कैलास आठे, “मास्वे”चे महासचिव प्रा संजय फुलकर, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ चंदू पोपटकर, कोषाध्यक्ष डाॅ.विलास घोडे, सहसचिव प्रा नितेश मोटघरे, कार्यकारिणीती सदस्य प्रा रुपेश कुचेवार व शुभांगी टुले उपस्थित होते. प्रा संजय फुलकर यांनी आयुक्त व बैठकीत उपस्थित सर्व अधिकारी वर्गाचे “मास्वे”च्या वतीने आभार मानले. बैठकीला सुरुवात करण्यापूर्वी समाज कल्याण आयुक्त पदावर अलीकडेच नियुक्ती झाल्याबद्दल श्री ओम प्रकाश बकोरिया यांचा “मास्वे” तर्फे सत्कार करण्यात आला.