<
जळगाव दि. २३ (क्रीडा प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा बुध्दिबळ असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र बुध्दिबळ असोसिएशन व अखिल भारतीय बुध्दिबळ महासंघ यांच्या मान्यतेने जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूलच्या आवारात २७ डिसेंबर २०२३ ते ४ जानेवारी २०२४ या नऊ दिवसांच्या कालावधीत राष्ट्रीय सब-ज्युनिअर (१५ वर्षा आतील मुले व मुलींच्या) बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या राष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धा स्विस-लीग प्रकाराने खेळविण्यात येणार असून स्पर्धकांना ११ फेऱ्यात विविध स्पर्धकांशी मुकाबला करावा लागणार आहे. या संपूर्ण स्पर्धेत एकूण नऊ लाखांची रोख पारितोषिके व वयोगटानुसार प्रथम तीन विजेत्यांना चषक देण्यात येतील तसेच प्रत्येक सहभागी खेळाडूंना पदके देण्यात येतील या संपूर्ण स्पर्धेचे प्रायोजकत्व जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. या जळगाव शहरातील सुप्रसिद्ध कंपनीने स्वीकारले आहे हेच नव्हे तर आयोजनामध्ये सुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा असणार आहे.
या राष्ट्रीय स्पर्धेत जम्मू-काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत भारतातील विविध २५ राज्यातील २१४ मुले व मुलीं खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. त्यात आसामचा कॅन्डीडेड मास्टर मयंक चक्रवर्ती, – २४०३, तामिळनाडूचा फिडे मास्टर दाक्षिण अरुण, – २३३२, कॅन्डीडेड मास्टर शेख सुमेर अर्श, तेलंगाना – २२५५, वेस्टबंगालची मृतिका मलीक १९७०, उत्तरप्रदेशची वुमन फिडे मास्टर शुभी गुप्ता, दिल्लीची साची जैन, इत्यादी.. विविध मानांकीत प्राप्त खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. १२८ मुलांपैकी ११४ तर ८६ मुलींनपैकी ७२ फिडे मानांकन प्राप्त खेळाडू असे २१४ स्पर्धक आहेत.
महाराष्ट्र, आसाम, तामिळनाडू, तेलंगाना, राजस्थान, आंध्रप्रदेश, दिल्ली, वेस्ट बेंगाल, गुजराथ, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, पंजाब, चंडीगड, हरियाणा, केरल, गोवा, उत्तराखंड, झारखंड, उडीसा, त्रिपुरा, ई. २५ राज्या मधून खेळाडू येत आहे.
स्पर्धेसाठी मुख्यपंच कलकत्ता येथील आंतरराष्ट्रीय पंच देवाशीस बरुआ, सहायक पंच पुणे येथील आंतरराष्ट्रीय पंच विनिता श्रोत्री व त्यांना मदतनीस ९ पंच असतील.
आपापल्या राज्याच्या संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व खेळाडूंची व संघ प्रशिक्षक अथवा संघ व्यवस्थापक यांची निवास व्यवस्था जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. द्वारे करण्यात आली आहे.
या राष्ट्रीय स्पर्धेतून सहभागी खेळाडूंना आपले फिडे मानांकन उंचविण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे तसेच ग्रांड मास्टर ही उपाधी मिळविण्यासाठीची वाटचाल या स्पर्धे द्वारे खेळाडूंना मिळणार आहे. या स्पर्धेत प्रथम सहा (६) विजेत्या खेळाडूंची निवड पुढील आंतरराष्ट्रीय/आशियाई स्पर्धांसाठी करण्यात येईल व हे खेळाडू आपल्या भारत देशाचे प्रतिनिधित्व करतील अशी माहित आजच्या पत्रकार परिषदेत जळगाव जिल्हा बुध्दिबळ असोसिएशनचे अध्यक्ष व स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारलेल्या जैन इरिगेशन कंपनीचे सह-व्यवस्थापकीय संचालक श्री अतुल जैन यांनी दिली.
या पत्रकार परिषदेत असोशिएशनचे सचिव नंदलाल गादिया, उपाध्यक्ष फारूक शेख, सहसचिव शकील देशपांडे, संजय पाटील, कार्यकारणी सदस्य चंद्रशेखर देशमुख, रवींद्र दशपुत्रे, आर. के. पाटील, विवेक दानी तसेच जैन स्पोर्ट्स अकादमीचे अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, प्रवीण ठाकरे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्वानुभावावर आधारीत ग्रीन स्कूल आहे. अनुभूती शाळेची हिरव्यागार, नयनरम्य, १०० एकरच्या परिसरात निर्मिती करण्यात आली आहे. अनुभूती ही एक आगळीवेगळी शाळा आहे. ही शाळा विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्ये आणि समज या बाबतीत सर्वोत्कृष्ट शैक्षणिक अनुभूती प्रदान करण्याचा प्रयत्न करते. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा, भावनिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक बाबींमध्ये वाढ आणि विकासासाठी सर्वोत्तम व्यासपीठ उपलब्ध करते.