<
जळगाव – (प्रतिनिधी) – रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे (रावेर लोकसभा 2024) उद्योगपती श्रीराम पाटील यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. पुणे येथे पक्षाचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील जळगाव जिल्ह्यातील माजी आमदार सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे आदी उपस्थित होते.
यावेळी पाच ते सहा तास चर्चा झाल्यानंतर श्रीराम पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. श्रीराम पाटील यांची ओळख ही जळगाव जिल्ह्यातील उद्योजक म्हणून आहे. अत्यंत सामान्य परिस्थितीतून त्यांनी उद्योजक होण्यापर्यंत भरारी गाठली आहे.
त्यांनी काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी तयारी दाखवली होती.
पक्षाच्या बैठकीत चर्चा करून सर्वानुमते त्यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात आले. रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे खासदार रक्षा खडसे यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे.
श्री साईराम प्लास्टिक अँड इरिगेशन ही त्यांची कंपनी आहे. सिका या इलेक्ट्रिक टू व्हीलरचे उत्पादक आहेत, श्रीराम फाउंडेशन रावेरचे ते अधक्ष आहेत. मराठा समाज भूषण, उद्योग भूषण असे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.