<
जळगाव दि. १० प्रतिनिधी – लोकसभा सार्वत्रीक निवडणूकीत मतदान हा आपला अधिकार आहे आणि कर्तव्यही मतदान करणे संविधानाचा सन्मान असून जैन इरिगेशनच्या सर्व सहकाऱ्यांकडून मतदान करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.
जैन हिल्सच्या अॅग्री पार्क येथे सहकाऱ्यांना गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी आणि जळगाव जिल्हा लोकसभा २०२४ चे मतदान जनजागृतीचे अधिकृत आयकॉन मदन रामनाथ लाठी यांनी प्रतिज्ञा दिली. लोकशाही प्रकियेत एक-एक मताचे महत्त्व काय असते हे उदारणावरुन त्यांनी सांगितले. यावेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. संधानशिव भारद्वाज, मानव संसाधन विभागाचे राजेश आगीवाल यांच्यासह सहकारी उपस्थित होते. जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेमार्फत आणि विविध सेवाभावी संस्थामार्फत जनजागृती होत आहे.
त्याअनुषंगाने जैन इरिगेशच्या सर्व आस्थापनांमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबविले जात आहे. अॅग्री पार्क, कृषी संशोधन प्रात्यक्षिक केंद्राचे सहकारी, कृषी विभाग, सुरक्षा विभागासह बायोटेक लॅबचे सहकारी यावेळी उपस्थित होते. मदन लाठी यांनी १३ मे ला जास्तीतजास्त मतदान करुन राष्ट्रीय उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. घरातील प्रत्येक सदस्यांनी, शेजारांना व नातेवाईकांना मतदानाचा करावे यासाठी प्रोत्साहन द्यावे आणि लोकशाहीला अधिक बलशाही करावे असे आवाहन मदन लाठी यांनी केले.