<
▪️बायपासचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर
▪️जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या दुचाकीस्वारास हेल्मेट सक्ती
▪️वाहतुक नियंत्रणासाठी रेडक्रॉस देणार वॉर्डन
▪️कार रेस लावणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल
▪️दुभाजक तोडणाऱ्यावर करण्यात येणार कडक कारवाई
जळगाव दि. 31 ( जिमाका ) जिल्ह्यातील वाढते अपघात रोखण्यासाठी जनजागृती बरोबर उपाययोजना करणे गरजेचे असून त्यासाठी जिल्हाप्रशासनाकडून बायपास रस्ता तात्काळ व्हावा म्हणून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे. शहरातील वाढती गर्दी,वाढलेले सिमेंटचे रस्ते आणि नवतरुणांच्या गाड्यांचे वाढते वेग यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आणि आरटीओ संयुक्त प्रयत्न करतील.हेल्मेट घालणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे असल्यामुळे इथून पुढे ती सवय लागावी म्हणून इथून पुढे जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या दुचाकी चालकांना हेल्मेट सक्ती करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
दिनांक 30 मे रोजी संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, राज्य परिवहन मंडळाचे वाहतुक अधिकारी दिलीप बंजारा, राष्ट्रीय महामार्गचे अभियंता सुनील गजरे, बांधकाम विभागाचे अभियंता आर. व्ही. बिऱ्हाडे यांच्यासह विविध वाहतूक संघटनांचे,स्वयंसेवी संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
शहरातील वाढती गरज लक्षात घेवून योग्य ते वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे असून यासाठी महानगरपालिका, पोलीस आणि आर टी ओ यांनी समन्वयाने जिथे गरज असेल तिथे वाहतूक सुरक्षा संदर्भात उपाययोजना कराव्यात हे सांगून बाहेर येणारी जड वाहतूक बायपासचे काम होत नाही तो पर्यंत सुरु राहिल. येत्या काही महिन्यात ते काम पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन पाठपुरावा करेल. एकदा बायपासचे काम पूर्ण झाले की मुख्यरस्त्यावर सिग्नल यंत्रणा बसविण्याबरोबर ज्या ज्या गोष्टी वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेच्या आहेत त्या केल्या जातील अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
*आता जिल्हाधिकारी कार्यालयात येताना हेल्मेट अनिवार्य*
नागरिकांना दुचाकी वाहन चालवताना डोक्याची सुरक्षितता अत्यंत महत्वाची असते. आता शहरात सगळीकडे सिमेंटचे रस्ते झाल्यामुळे गाड्यांचे वेग वाढतायत, कमी वेगाने गाड्या चालविण्याची संस्कृती रूळविण्यासाठी सुरुवातीला वेगाने गाडी चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशा सूचना देऊन लोकांना हेल्मेटची सवय लागावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात येताना दुचाकीचालकांना हेल्मेट अनिवार्य करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलिसांना मदत म्हणून रेडक्रॉस सोसायटी कडून वॉर्डन देणार असल्याची घोषणा रेडक्रॉस सोसायटीच्या पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आली. महामार्गावरले आपल्या सोयीसाठी म्हणून अनेकांकडून दुभाजक तोडण्याचे काम होते आहे. हे अपघाताला निमंत्रण असून असे करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आले. तसेच महामार्ग किंवा राज्य मार्ग, शहरातील रस्ते यावर कार रेस लावण्याच्या गोष्टी निदर्शनास आल्या आहेत. याबाबत पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्याचे निर्देश आपल्याकडून देण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
प्रारंभी प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्या कडून जिल्ह्यातील रस्ता सुरक्षिततेबाबत सविस्तर सादरीकरण झाले. त्यात जिल्ह्यातील तीन ब्लँक स्पॉटवर सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वते उपाययोजना झाल्या असून जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्र शोधले असून येत्या काही महिन्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले.