<
जळगाव, दि. 23 (जिमाका ) प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत खरीपातील पिकांचा उत्पन्नावर आधारीत जिल्हयातील ४ लक्ष ५६ हजार १२८ शेतक-यांनी विमा उतरविला होता. या विमा धारक शेतक-यांना लाभ मिळण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री ( क्रीडा व युवक कल्याण ) रक्षाताई खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदारांनी जिल्हाधिकारी व कृषि विभागासोबत वेळोवेळी बैठका घेवून विमा कंपनीला निर्देश दिले होते. त्यानुसार विमा कंपनीने ३ लक्ष ८७ हजार ९७३ शेतकरी पात्र केले असून त्यासाठी ओरिएंटल इंडीया इंन्सुरंन्स कंपनीमार्फत ५२३ कोटी २८ लक्ष निधीस कंपनीकडून मान्यता देण्यात आली आहे.आज पर्यंतचा जिल्ह्यातील सर्वाधिक पीक विमा निधी मंजुर झालेला आहे. याबाबत आजच्या कॅबीनेटच्या बैठकीत सदर रक्कम शेतक-यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यासाठी शासनाने विमा कंपनीस वर्ग करण्याबाबतची मागणी केली. यामुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जिल्हयातील तालुकानिहाय मंजूर शेतकरी संख्या व त्याची रक्कम
अमळनेर ५५ हजार ८२४ शेतक-यांसाठी, ३६ कोटी १० लक्ष, भडगाव २३ हजार ७७१ शेतक-यांसाठी, ११ कोटी ८४ लक्ष, भुसावळ ८ हजार ४७६ शेतक-यांसाठी, ७ कोटी ५५ लक्ष, बोदवड १२ हजार ९५९ शेतक-यांसाठी, १७ कोटी ८४ लक्ष, चाळीसगाव ५७ हजार ५८९ शेतक-यांसाठी, ११२ कोटी, चोपडा ३१ हजार ५२६ शेतक-यांसाठी, ५१ कोटी २१ लक्ष, धरणगाव १० हजार ५३३ शेतक-यांसाठी, ४७ कोटी ९५ लक्ष, एरंडोल २३ हजार ६७६ शेतक-यांसाठी, १५ कोटी २१ लक्ष, जळगाव १२ हजार ५५८ शेतक-यांस ठी, ४ कोटी ९० लक्ष, जामनेर ५७ हजार ९६४ शेतक-यांसाठी, १४ कोटी ४ लक्ष, मुक्ताईनगर २ हजार शेतक- यांसाठी, ९ लक्ष ५१ हजार, पाचोरा ४६ हजार ११६ शेतक-यांसाठी ९३ कोटी ५८ लक्ष, पारोळा ४० हजार ४० शेतक-यांसाठी, २० कोटी ९४ लक्ष, रावेर ८९० शेतक-यांसाठी, ५० लक्ष ८७ हजार, यावल ७ हजार ५१ शेतक-यांसाठी ५ कोटी ९१ लक्ष असे एकुण ३ लक्ष ८७ हजार ९७३ शेतक-यांसाठी ५२३ कोटी २८ लक्ष ०५ हजार ३८९ रुपये निधी ओरिएंटल इंन्सुरंन्स इंडीया लि. कंपनीने मंजुर केलेला आहे. यामुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यावर्षी जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांना मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती (मिड सीजन ऍडव्हसिटी २५ टक्के) अग्रीम हा जिल्ह्यात ८२ कोटी ५२ लाख वितरित झालेला आहे. तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्ती खरीप हंगाम २०२३ करिता जिल्ह्यातील पात्र विमाधारक शेतकऱ्यांना ५० कोटी ११ लाख रुपये वितरीत करण्यात आलेले आहे. उत्पत्रावर आधारीत खरीप हंगाम २०२३ करीता नुकतीच मंजुर झालेली ५२३ कोटी इतकी रक्कम ही कंपनीमार्फत वर्ग करण्याची कारवाई सुरू असल्याचे कृषि विभागाने सांगितले.
शेतकरी बांधवाना आवाहन
प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी एक रुपया नाममात्र एवढा ऐच्छिक विमा हप्ता असल्याने सर्व शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम २०२४ करिता याचा लाभ घ्यावा असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री ( क्रीडा व युवक कल्याण ) रक्षाताई खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री यांच्यामार्फत करण्यात आले आहे. विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख ही ३१ जुलै २०२४ असली तरी पिक विमा नोंदणीच्या शेवटच्या दिवसातील गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी त्वरित सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात येत आहे. आपल्या जवळच्या CSC/VLE केंद्र, बैंका येथे पीक विमा नोंदणी करता येते. आपले सरकार सुविधा केंद्र धारकास विमा कंपनी मार्फत प्रती अर्ज रु ४० प्रमाणे रक्कम अदा करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागत नाही याची नोंद सर्व शेतकऱ्यांनी घ्यावी असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने सांगितले आहे.