<
जळगाव – बालमृत्यू होण्याची साधारणपणे पाच कारणे आहेत. त्यातील अत्यंत महत्वाचे कारण म्हणजे डिहायड्रेशन अर्थात अतिसार. अतिसारामुळे बालके दगावण्याचे प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण नियंत्रणात आणायचे असेल तर ओआरएस म्हणजेच जलसंजीवनीचा वापर अधिक करणे आवश्यक असल्याचे मत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. अनंत बेंडाळे यांनी व्यक्त केले.
जागतिक ओआरएस दिनानिमीत्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयाच्या बालरोग विभागातर्फे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलतांना डॉ. बेंडाळे म्हणाले की, लहान मुलांना अतिसार होणे, अति ताप येणे यामुळे सर्वाधिक बालमृत्यू होतात. शरीरातील पाणी कमी झाल्यानंतर, लघवी कमी होणे, अश्रु कमी होणे, जीभ कोरडी पडणे, त्वचेला चिमटी घेतल्यास ती त्वरीत पुर्ववत न होणे अशी अतिसाराची लक्षणे आहेत. ही लक्षणे गंभीर असल्याने त्यावर उपचार करणे आवश्यक असते. ओआरएस अर्थात जलसंजीवनी हे साखर, मीठ व पाणी हे प्रमाणात टप्प्याटप्प्याने घेतल्यास अतिसार कमी होतो.
जागतिक आरोग्य संघटनेने देखिल ओआरएस वापरासंबंधी मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. त्यानुसार ओआरएसचा अधिकाधिक वापर केल्यास अतिसाराची समस्या दूर होते. तसेच बालकाची रोगप्रतिकारक शक्ती देखिल वाढण्यास मदत होते. जागतिक ओआरएस दिन साजरा करतांना ओआरएसचे महत्व जाणून घेऊन त्याचा वापर केल्यास बालमृत्यू सहज कमी होतील असा विश्वास डॉ. अनंत बेंडाळे यांनी व्यक्त केला. बालरोग तज्ञ डॉ. रोहीणी देशमुख यांनी आभार मानले.
ओआरएसमुळे 50 टक्के आजार आटोक्यात- डॉ. अणेकर
बालरोग तज्ञ डॉ. अणेकर यांनी मार्गदर्शन करतांना ओआरएसचे महत्व पटवून सांगितले. ओआरएसच्या वापरामुळे लहान मुलांमधील 50 टक्के आजार आटोक्यात आणता येतात. तसेच बालकाला कुठल्याही सलाईनची गरज पडत नाही. आपल्या देशात दुर्गम भागात याबाबत जनजागृती अधिक गरजेची असल्याचे हॉ. अणेकर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी केले ओआरएसबाबत सादरीकरण
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील आदित्य महाजन, ऋषीकेश मडके, आदित्य काळे, महिमा गुल्हाणे, गुंजन जैन या विद्यार्थ्यांनी ओआरएसचे महत्व आणि वापरासंबंधीचे प्रात्याक्षिक कार्यक्रमात सादर केले. यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला डॉ. सुयोग तन्नीरवार, डॉ. उमाकांत अणेकर, डॉ. रोहिणी देशमुख, डॉ. दर्शन राठी, डॉ. कुशल धांडे, डॉ. चंदाराणी देगूलरकर, डॉ. ओमश्री गुडे, भारती झोपे यांच्यासह विद्यार्थी व माता उपस्थित होत्या.