रावेर, दि.१ ऑगस्ट – रावेर तालुक्यातील पिंप्री-मंगरूळ रस्त्याच्या कामासाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे बुधवारी भर पावसात खड्ड्यात बसून आंदोलन केले होते. गुरुवारी सकाळी विवरा-रेंबोटा रस्त्याच्या डागडुजी संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला. साहेब.. रस्त्याची लवकरात लवकर डागडुजी करा, आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका, असे सांगितले. अधिकाऱ्यांनी लागलीच दखल घेत मुरूम पाठवत रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात केली.
रावेर-यावल परिसरातील अनेक गावात रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे झाले असून काही ठिकाणी तर रस्तेच शिल्लक राहिलेले नाही. नागरिकांचे हाल होत असल्याने प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झाला असून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. बुधवार दि.३१ जुलै रोजी प्रहारतर्फे पिंप्री-मंगरूळ रस्त्याच्या कामासाठी भर पावसात खड्ड्यात बसून आंदोलन केले होते. अधिकाऱ्यांना देखील आंदोलनाची दखल घेत खड्ड्यात बसावे लागले आणि काम लवकरात लवकर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
एकच फोन आणि कामाला सुरुवात..
बुधवारी केलेल्या आंदोलनामुळे गुरुवारी सकाळी विवरा-रेंबोटा परिसरातील काही नागरिकांनी रस्त्याची समस्या प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्याकडे मांडली. अनिल चौधरी यांनी लागलीच संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला. साहेब.. नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांचा रोष ओढवून घेऊ नका. आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका. डागडुजी लवकरात लवकर करून द्या, असे त्यांनी सांगितले. अनिल चौधरी यांच्या फोनची दखल घेत लागलीच ७-८ ट्रॅक्टर मुरूम पाठवून कामाला सुरुवात केली.
नागरिकांचा त्रास वाचणार, अधिकाऱ्यांचे आभार
सर्वच शासकीय अधिकारी हे नागरिकांच्या कामासाठी तत्पर आहेत. योग्य पद्धतीने पाठपुरावा केला आणि त्यांच्याकडून कामे करून घेतल्यास ते सहकार्य करतात. काही अडचणी असल्यास ते तसे सांगतात. आमच्या विनंतीची दखल घेत विवरा-रेंबोटा रस्त्याच्या कामाला सुरुवात केल्यामुळे अधिकाऱ्यांचे आभार मानतो. नागरिकांचा मोठा त्रास वाचणार असून पिंप्री-मंगरूळ रस्त्याच्या कामाला देखील लवकरात लवकर सुरुवात होईल, हि अपेक्षा असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी सांगितले.