<
जळगाव- (प्रतिनिधी) – दिनांक 9 ऑगस्ट 2024 विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त जळगाव शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला श्री गजमल पवार (राज्य अध्यक्ष, ऑल इंडिया एम्पलॉइज फेडरेशन महाराष्ट्र राज्य) श्री मोहन पावरा श्री वसंत वळवी ई मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून आदिवासी गौरव दिनानिमित्त रॅलीची सुरुवात करण्यात आली. स्टेशन रोड, कोर्ट चौक, स्वातंत्र्य चौक, प्रभात चौक येथे शानबाग मंगल कार्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते आदिवासी समाजातील समाजाचे आराध्य दैवत यामोगी देवी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तंट्या मामा भिल, बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मार्गदर्शन कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.जयेश पाडवी यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकात आदिवासी गौरव दिनाचे महत्त्व उपस्थितांना सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथील सहयोगी प्रा.डॉ. संगीता गावित ह्या होत्या. श्री मोहन पावरा यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. आदिवासी गौरव दिनाच्या निमित्ताने मान्यवरांचे व्याख्यान आयोजित केले होते. प्रा.डॉ शाम सोनवणे यांनी आपल्या मनोगत सांगितले की, येणाऱ्या काळात आदिवासी समाजासमोर असलेल्या समस्या आणि त्यातून बाहेर पडायचे असेल तर शैक्षणिक प्रगती शिवाय पर्याय नाही, याची जाणीव करून दिली. संविधानाने आदिवासी जमातींना दिलेले घटनात्मक संरक्षण बाबत जनजागृती करण्यासाठी आदिवासी समाजातील तरुण आणि बुद्धिजीवी लोकांनी एकमेकांसोबत समन्वय साधून तळागाळातील बांधवांना विकास प्रक्रियेत आणण्यासाठी प्रयत्न करावेत. तरच समाजाची प्रगती शक्य आहे असे आवाहन केले. सुप्रीम कोर्टाने बहुमताने पारित केलेला निर्णय आणि आदिवासी समाजासमोरही आव्हाने यावर प्रकाश टाकला. ऑल इंडिया एम्पलॉइज फेडरेशन महाराष्ट्र राज्याध्यक्ष श्री गजमल पवार यांनी आदिवासी समाजाचे सद्यस्थिती सांगून विद्यार्थ्यांना येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स महत्त्वाचा आहे हे सांगितले. प्रा.डॉ. गौरी वळवी, प्रा.डॉ. विशाल पराते, श्री रोहिदास पावरा, सौ शीतल वसावे, सौ इंदुबाई गजमल पवार, प्राचार्य नाना गायकवाड, श्री वसंत वळवी, इत्यादी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रबोधन कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. संगीता गावित यांनी आदिवासी समुदायाची संस्कृती आणि त्यांच्या समस्यांना जागृती निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवा इतर समाजास प्रमाणे आदिवासी समाजाने देखील शैक्षणिक प्रगती साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे आयोजन ऑल इंडिया एम्पलॉइज फेडरेशन महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा, आदिवासी क्रांती पारधी संघटना, महाराष्ट्र प्रदेश. आपू आदिवासी महिला मंडळ, जळगाव. यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.