<
चाळीसगाव – (प्रतिनिधी) – दिनांक १९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान दरवर्षी देशभर जागतिक वारसा सप्ताह साजरा केला जातो यात पुराणतन वास्तु स्थळे मंदिरे गड किल्ले लेण्या अशा अनेक पुरातन वारसांच्या बाबत त्यांचे जतन साफसफाई व ऐतिहासिक महत्त्व याबाबत जनजागृतीपर उपक्रम राबवले जातात याचाच एक भाग म्हणून सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगाव च्या वतीने दिनांक २४ नोव्हेंबर रोजी गौताळा अभयारण्यातील अत्यंत पुरातन असलेल्या सीतान्हाणी (पाणपोई) या वास्तूची साफसफाई करण्यात आली.
या संपूर्ण वास्तू वर वाढलेले मोठमोठाले गवत वेली काटेरी झुडपे काढून तिला मोकळे करण्यात आले गवत आणि काटेरी झुडपांमध्ये लुप्त होत असलेल्या या वास्तूस यामुळे मोकळा श्वास मिळाला आहे या पुरातन वास्तूला पानपोई असे देखील म्हटले जात असून हेमाडपंथी मंदिरा सारख्या आकारात उभ्या असलेल्या या वास्तूमध्ये दोन मोठ मोठी पाण्याची रांजणे असून त्यात येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत होते सायगव्हाण जवळील भिलदरी जवळ असलेल्या खानदेशातून मराठवाड्यामध्ये जाण्यासाठीच्या पुरातन व्यापारी मार्गावर ही वास्तू असल्याने या पाण्याचा उपयोग त्यावेळी मोठ्या प्रमाणात होत असावा आज या वास्तूची संपूर्णपणे साफसफाई करून सह्याद्री प्रतिष्ठानने पुन्हा एकदा या वास्तूस नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला आहे.
यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप घोरपडे, जिल्हा प्रशासक गजानन मोरे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन पाटील, संजय साठे सर, गणेश पाटील, जितेंद्र वाघ, बाळासाहेब सोनवणे, नाना चौधरी, भाऊसाहेब पाटील, जितेंद्र वरखेडे, संजय पवार, पैलवान सचिन पाटील, संभाजी पाटील, ललित चौधरी, शेखर आगोणे, ललित अण्णा चौधरी, गोरख वाघ, उमेश खेडकर, आदी उपस्थित होते.