<
जळगाव दि. 10( जिमाका ) – जिल्ह्यात नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे व त्यांच्या अडचणी, समस्या दुर व्हाव्यात याकरिता अनेक योजना व सवलती देण्याचा प्रयत्न शासन वेळोवेळी करत असते. आता अशा सर्व कामाचा गुगल फ्लोचार्ट काम होईल तसे नियमित अधिकाऱ्यांकडून भरला जाईल आणि ते सर्वांना दिसेल त्यामुळे अधिकाऱ्याला आपण कशात मागे आहोत हे कळेल आणि त्यातून कामाला गती येईल. जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांची बैठक घेवून तसे निर्देश दिले आहेत. यात भूसंपादन, बालविवाह प्रतिबंधक मोहीम, शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला जातीचे दाखले, बेकायदा वाळू वाहतूक करणारे वाहन लिलाव, विभागीय चौकशी, विविध न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणे, उपविभागीय न्यायालयात खटले निकाली काढणे, नॉन क्रीमी लेयर, स्वच्छ सुंदर कार्यालय, तक्तानिहाय तपासणी – उपविभागीय कार्यालय मंडलधिकारी कार्यालयाची पाहणी, स्वाभिमान सबलिकरण योजना, वन हक्क कायदा, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, अडथळ्यांचा सामना करणारे मोठे प्रकल्प या सर्व कामांचा यात समावेश करण्यात आला आहे.यासोबत संबधित अधिकाऱ्यांना निर्धारित लक्ष्य देण्यात आले आहे. त्या प्रमाणे या फ्लो चार्ट मध्ये त्यांनी केलेल्या कामांची माहिती भरावयाची आहे.
तहसिल कार्यालयांतर्गत अवैध वाळू उपसा, खाण व घाटांचे ईटीएस मोजणी,एकूण लेखापरीक्षण परिच्छेद, इ फेरफार , सेवा पुस्तक अध्ययन, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, अधिकारी नसलेले कार्यालय, राज्याच्या अर्थसंकल्प इमारत बाधकामांची स्थिती, डीपीडीसी बांधकाम स्थिती, दंडाधिकारी प्रकरणे, महसुल प्रकरणे, ग्रामपंचायत चौकशी, जन्म दाखला, रेशन कार्ड, ईजीएस अंतर्गत अपुर्ण कामे, लोकांच्या तक्रारी या सर्व प्रकरणही त्यात येणार आहेत. यामुळे विभागात सशक्त स्पर्धा होऊन लोकोपयोगी योजना, कामांना योग्य गती मिळेल अशी अपेक्षा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केली आहे.