जळगाव- (जिमाका) – राज्यात ऊर्जा संवर्धन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) या महाराष्ट्र शासनाच्या संस्थेस ऊर्जा दक्षता ब्यूरो, भारत सरकार, विद्युत मंत्रालय यांच्या मार्फत दि.१४ डिसेंबर रोजी आयोजित “राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार २०२४” मधील “राज्य ऊर्जा कार्यक्षमता कामगिरी पुरस्कार” (गट-1) या वर्गवारीमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त मिळाला आहे.
ऊर्जा संवर्धन क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी देश पातळीवर हा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे ऊर्जा संवर्धन दिनाचे औचित्य साधून दि. १४ डिसेंबर, २०२४ रोजी झालेल्या एका विशेष कार्यक्रमात उपराष्ट्रपती श्री. जगदीप धनखड़ यांच्या उपस्थितीत नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांच्या शुभहस्ते महासंचालिका डॉ. श्रीमती कादंबरी बलकवडे, हा पुरस्कार स्विकारला.
राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती आभा शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली राज्या मध्ये ऊर्जा संवर्धन व अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यात येत आहे.