<
जळगाव दि. 3 (प्रतिनिधी) – महात्मा गांधीजींच्या 150 वी जयंतीनिमित्त अनुभूती इंटरनॅशनल निवासी शाळेमध्ये संध्याकाळी गांधी विचारांवर दिव्यांगांनी नाटिकेतून प्रकाश टाकला. गांधीजींनी केलेल्या दांडी यात्रा, सत्याग्रह, सत्य, अहिंसेतुन मिळवुन दिलेल्या स्वातंत्र्याचा प्रवास नाटिकेतुन उलगडून दाखविला.
यावेळी आंतरराष्ट्रिय ख्यातीचे शास्त्रज्ञ व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, गांधीजींचे पणतू तुषार गांधी, डॉ. भालचंद्र नेमाडे, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त सेवादास दलीचंदजी ओसवाल, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अजित जैन, अतुल जैन, जैन फार्मफ्रेश फूडसचे कार्यकारी सुनील देशपांडे, अनुभूती स्कूलच्या संचालकिका निशा जैन, प्राचार्य जे. पी. राव, डॉ. सुभाष चौधरी व जैन परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.
महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शात्री यांच्या जयंतीनिमित्त संध्याकाळी दिल्ली येथील दिव्यांग (स्पेशल नीडस्) व्यक्तींसाठी कार्यरत असलेली कलर्ड झेब्रा या संस्थेच्या सदस्यांनी गांधीजींच्या जीवन चरित्रावर आधारित नाटिका सादर केली. चाळीस मिनिटांच्या या नाटिकेत राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जीवन कार्यावर अभिनय, संगीत आणि संवाद यांचा सुंदर मिलाफ रसिकांना गांधीजींच्या विचारांशी एकरूप करीत होता. रेल्वे प्रवासात प्रथम श्रेणीचे टिकीट असताना अपमानीत करून बाहेर काढण्याचा प्रसंग, या घटनेतुन बोध घेत ‘मोहन ते महात्मा’ या प्रवासातील महत्त्वाचे प्रसंग नाटिकेतुन अधोरेखित केले. रसिकांसमोर चंपारण्य सत्याग्रह, गांधी, आंबेडकर यांच्यातील पुणे करार यासह अनेक प्रसंग ऐतिहासिक संदर्भाव्दारे कलाकारांनी अचुक मांडले.
दिल्ली येथील द कलर्ड झेब्रा संस्थेतर्फ हे नाटक सादर करण्यात आले. यातील दहा कलाकार दिव्यांग असून चार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. यातील कुठलेही कलाकार हे व्यावसायिक नसून त्यांच्यावर आठ महिने थिएटर थेरपी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना बोलणे, अभिनय, रंगभूमिवरील वावर हे त्यांचे वैशिष्ट्य असल्याचे संस्थेच्या वंदना सहगल यांनी यावेळी सांगितले. दिल्ली येथील कलर्ड झेब्रा संस्थेचा जळगाव येथे हा तिसरा नाट्य प्रयोग होता. त्याला रसिकांनी भरभरून दाद दिली. मोहनदास करमचंद गांधी यांच्या भुमिकेत कबिर हांडा, महात्मा गांधीजींच्या भुमिकेत देवेश भल्ला, बापूंच्या भुमिकेत नगरदीप मड्डाल, सरोजनी नायडूंच्या भुमिकेत दमयंती मड्डा, अनुरूध्द मेहरा याने रविंद्रनाथ टागोर आणि डॉ. आंबेडकर यांची भुमिका साकारली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.