जळगाव -(प्रतिनिधी)- येथील रहिवासी असलेले बहिण-भाऊ हे दोघेही मानसिक विकारांनी त्रस्त होते. या दोन्ही भावंडांवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील मानसोपचार तज्ञांनी केलेल्या उपचाराला यश आले असून हे दोघेही मानसिक विकारातून बरे झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, अजय आणि माधुरी (नाव बदललेले आहे) हे दोन्ही भावंड जळगावातील एका भागात राहतात. हे दोन्ही सुशिक्षीत असून त्यांचे वडील खासगी काम करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवितात. घरातील परिस्थिती जेमतेम असून दोन्ही भावंडांपैकी बहिणीची चिडचिड वाढली होती. ती प्रचंड संतापी होऊन तिला मारण्याची इच्छा होत होती. अशातच तिचे लग्न झाले. तीला एक मुलगीही झाली. कालांतराने ती पतीपासून विभक्त झाली. कौटुंबिक कारणांचा तिच्या मनावर परिणाम झाला आणि तीला मानसिक विकार जडल्याने ती माहेरी येऊन राहू लागली. बहिणीची देखभाल करता करता भाऊ देखिल स्वत:शीच बडबड करू लागला. त्याचे बी.कॉम पर्यंतचे शिक्षण होऊन तो खासगी नोकरी करीत होता. परंतु त्याचेही मानसिक स्वास्थ ठिक राहत नसल्याने त्याला नोकरी सोडावी लागली. ह्या दोन्ही भावंडांवर मानसिक विकारामुळे उपचार करण्यात आले. मात्र उपचाराचा फारसा सकारात्मक परिणाम झाला नाही. अखेरीस ह्या दोन्ही भावंडांना डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मानसोपचार विभागाचे डॉ. विलास चव्हाण यांच्याकडे दाखविण्यात आले. याठिकाणी त्यांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. तपासणीअंती स्क्रिझोफेनिया या आजाराचे निदान करण्यात आले. निदानानंतर दोन्ही भावंडांना उपचारासाठी रूग्णालयातच भरती करण्यात आले. याठिकाणी डॉ. आदित्य जैन, डॉ. सौरभ भुतांगे, डॉ. उमा चांदूरकर आणि डॉ. हिमांशू जाधव यांनी बहिण-भावावर उपचार आणि समुपदेशन सुरू केले. आठच दिवसात दोन्ही भावंडांच्या वागण्यात सकारात्मक बदल दिसू लागला. त्यानंतर त्यांना पूर्णत: बरे वाटू लागले. त्यांची रूग्णालयातून सुटी करण्यात आली. त्यानंतर त्यांना वेळोवेळी रूग्णालयात बोलावून त्यांच्या प्रकृतीत होणार्या सुधारणेकडे लक्ष ठेऊन औषधोपचार सुरू ठेवले. औषधोपचार आणि समुपदेशन यामुळे दोन्ही बहिणभाऊ हे मानसिक विकाराच्या आजारातून पूर्णत: बरे झाले.
घरात एखादी व्यक्ती मानसिक विकारांनी त्रस्त असेल तर त्याचा परिणाम दुर्मिळरित्या दुसर्यावरही होऊ शकतो. या दोन्ही भावंडांमध्ये अशाच प्रकारची स्थिती निर्माण झाली होती. परंतु ते वेळीच रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याने त्यांच्यावर योग्य ते औषधोपचार आणि समुपदेशन करण्यात आले. डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात रूग्णाकडे परिवारातील सदस्याप्रमाणेच दृष्टीकोन ठेऊन उपचार केले जातात. त्यामुळे उपचाराला सकारात्मक प्रतिसाद मिळतो.
– डॉ. उमा चांदूरकर, मानसोपचार विभाग.