जळगाव- (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मिडीयम हायस्कूलची कु. चार्वी विक्रम रंधे हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९५.२०% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण शाळेसह कुटुंबीय, शिक्षकवर्ग व मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण आहे.
चार्वी ही अभ्यासाबरोबरच विविध कलाक्षेत्रात अग्रेसर राहिलेली विद्यार्थीनी आहे. सूपर डान्सर, सूपर डान्सर महाराष्ट्र, डान्स दिवाने जूनियर, डान्स महाराष्ट्र डान्स, मी होणार सुपरस्टार, तसेच HDFC Life YoungStar यांसारख्या नामांकित डान्स रिअॅलिटी शोजमध्ये तिने यशस्वी सहभाग नोंदवून आपली नृत्यकला सिद्ध केली आहे. तिच्या प्रभावी सादरीकरणाने प्रेक्षकांची मनं जिंकली असून परीक्षकांकडूनही तिला प्रशंसा मिळाली आहे.
चार्वीचे वडील विक्रम रंधे हे सार्वजनिक बांधकाम विभागात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असून, आपल्या मुलीच्या या बहुआयामी यशामुळे त्यांच्या विभागातही कौतुकाचे आणि अभिनंदनाचे संदेश दिले जात आहेत.
चार्वीचा अभ्यास, नृत्य आणि जिद्दीचा संगम हे इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक ठरत आहे. भविष्यात तिला शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात आणखी उंच भरारी घेता यावी, यासाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.