<
फडणवीस प्रदेशाध्यक्ष कसे झाले याची ही स्टोरी आहे.
त्याआधी मुनगंटीवार राज्याचे अध्यक्ष होते. मुंडेंना सुधीरभाऊ नितीन गडकरींचा माणूस म्हणून नको होते. सुधीरभाऊ एकदा मुंडेंची मनधरणी करायला पण गेलेले. पण २०१४ च्या निवडणुका वर्षभरावर होत्या आणि मुंडेंनी मोठी मोट बांधायचं ठरवलं होतं. अश्यावेळी प्रदेशाध्यक्ष आपलं सगळं ऐकण्यातला हवा होता. प्रकाश मेहता पासून ते देवेंद्र फडणवीस अशी नावं सुरू होती.
फडणवीस नागपूरचे असले तरी दुसरे नागपूरकर गडकरी भाऊंशी त्यांचे काही प्रेमाचे संबंध, तेव्हाही नव्हते…आजही नाहीत. दोन्हीबाजूने सगळा तोंडदेखला कारभार. यामुळे मुंडेंनी फडणवीस हे नाव पक्क केलं.
त्या आधीच्या चार दोन वर्षात रोजच्यारोज सभागृहात आणि मराठी टीव्ही च्या चर्चेमध्ये भाग घेतल्याने अभ्यासू आमदार अशी त्यांची इमेज बनली होतीच. हा सगळा विचार करून मुंडेंनी फडणवीसांचे नाव पुढे केले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते राजनाथ सिंग. त्यांना हे लक्षात आलं की देवेंद्र हे नाव मुंडे गटाकडून आलं आहे. पण ते इतर सगळ्यांना मान्य आहे की नाही याचा त्यांना अंदाज नव्हता. राजनाथ हा अंदाज घेत होते म्हणून नियुक्तीला थोडा वेळ जात होता.
इकडे मुंडेसाहेब त्या दिवसांत अधिक अस्वस्थ. एक दिवशी अश्याच अस्वस्थतेत ते देवेंद्रना घेऊन खडसेंच्या त्यावेळच्या विरोधी पक्ष नेतेपदाच्या त्या बंगल्यात गेले. संध्याकाळची वेळ होती. गेल्या गेल्या मुंडेंनी खडसेंना सांगितलं की राजनाथ सिंगांना फोन लावून सांग की देवेंद्र सगळ्यांना मंजूर आहे.
आता मुंडे नाथाभाऊंचे नेते. आपल्या नेत्याचं म्हणणं कसं टाळायचं हा प्रश्न. पण पक्षात ज्युनियर फडणवीसांना या पदावर आणायचा जो घाट घातलेला होता त्याबद्दल थोडी अस्वस्थता होती. मुंडेंना कोण सांगणार पण खडसेंकडे हे सगळं बोलून दाखवलं जायचं. अश्यावेळी सगळ्यांचं मन वळवावं आणि मग फडणवीसांना अध्यक्ष करावं हा नाथाभाऊंचा विचार. मुंडेंना तो आडून आडून सुचवायचे. पण आपलं म्हणणं दिल्ली परत एकदा डावलते की काय या काळजीने मुंडे अस्वस्थ. अश्या काळात मुंडेंनी खडसेंना राजनाथ सिंगांना कॉल करून सांग असा आदेश दिलेला!
खडसेंनी कॉल लावला. तिकडे अध्यक्ष राजनाथ. खडसे म्हणाले की राजनाथजी, देवेंद्र बहोत अच्छी चॉईस है. युवा है. पार्टी को फायदा होगा. आप नियुक्ती कर दिजीए. राजनाथ पण कसलेले खेळाडू आहेत. त्यांना अंदाज आला की खडसेंच्या बाजूला कोणीतरी बसलेलं आहे. त्यांनी विचारलं कोई साथ है क्या, अगर है तो फिर मैं थोडी देर बाद कॉल करता हूं. झालं, तिकडून फोन कट.
इकडे मुंडेही राजनाथ यांना पुरते ओळखून होते. ते तिथेच बसून राहिले. खडसेंना म्हणाले मला भूक लागलीय मला पोहे हवेत. झालं, पोहे बनवायला घेतले. वेळ वाढत चाललेला. खडसेंची गोची. एकीकडे नेता ज्याच्यावर जीवापेक्षा अधिक प्रेम केलं. दुसरीकडे अध्यक्ष. खडसे माणूस पक्षशिस्तीचा. काय करावं.
वास्तविक, खडसेंनाही वाटे की देवेंद्र अध्यक्ष व्हावेत. पण मुंडेंनी जरा ‘पल्याड’च्यांना सोबत घ्यावं जेणे करून देवेंद्र यांची वाट सुकर होईल ही भावना. उद्दिष्ट एकच. फक्त किती वेगात जायचं याचा अंदाज तेवढा वेगवेगळा.
पोहे खाऊन झाले. मुंडे बसूनच. सोबत फडणवीस. नाथाभाऊंना जाणवलं की मुंडेंच्या लक्षात आलंय राजनाथ यांचा फोन येणारेय. अखेर तो फोन आलाच. मुंडेंनी लगेचच सांगितलं की देवेंद्रच अध्यक्ष होणार हे ठासून सांग. राजनाथ लाईनवर आले तेव्हा खडसेंनी मग तसं सांगितलं. नियुक्ती नक्की झाली. फडणवीस राज्याच्या प्रमुखपदी आले. काही महिन्यांत केंद्रात सत्ता आली. आणि मग पुढचा सगळा इतिहास तुम्हांला ठाऊक आहेच!
आता खडसेंचा पत्ता निष्ठुरपणे कापला गेला. ज्यांनी कापला त्यांना हा इतिहास माहिती आहेच. तरीही कापला. त्यांच्या मदतीला कोण आलं धावून? सुधीर मुनगंटीवार एकमेव! ज्यांचं पद जात असताना निर्णायक विरोधी मत खडसेंनी दिलं ते मुनगंटीवार!! काय म्हणाले, “खडसेंवर जी वेळ आली ती कुणावरही येऊ नये.” ही एकट्या सुधीरभाऊंची भावना नाही. महाराष्ट्रात राजकारण ज्यांना थोडं तरी समजतं त्यांना खोलवर आत हेच जाणवलेलं आहे. काहीजण बोलून दाखवतात, बाकीचे मनात ठेवतात!!!
काळाचे फासे कसे पडतात बघा!! – व्हाट्सअप साभार