शासकीय सेवेत उच्च पदावर कार्यरत असताना आपल्या सहकाऱ्यांबद्दल संवेदनशीलता, कृतज्ञता आणि मानवी मूल्ये जपणारे अधिकारी समाजात प्रेरणादायी ठरतात. याचे उत्तम उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्षेत्रातील माननीय सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, जळगाव यांच्या कार्यालयातील प्रशासकीय वाहन चालक श्री. रवींद्र दौलतराव पवार यांची शासकीय नियत वयोमानानुसार दिनांक १ जून २०२६ रोजी सेवापूर्ती झाली. कार्यालयामार्फत त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. मात्र या निरोप समारंभाचा शेवट सर्वांच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवून गेला.

कार्यक्रम संपल्यानंतर सहसंचालक कार्यालयाचे प्रमुख व वरिष्ठ अधिकारी डॉ. पराग मसराम यांनी एक आगळावेगळा आदर्श घालून दिला. आपल्या प्रशासकीय वाहन चालकाने अनेक वर्षे सेवा दिली, तर त्याच्या सेवेला सन्मान म्हणून आपणही त्याला सेवा द्यावी या भावनेतून त्यांनी स्वतः वाहनाचे स्टेअरिंग हाती घेतले. श्री. पवार व त्यांच्या कुटुंबीयांना त्याच प्रशासकीय वाहनातून त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविण्याचे कार्य त्यांनी स्वतः केले. त्या दिवशी अधिकारी नव्हे, तर एक संवेदनशील माणूस आणि सहकारी म्हणून त्यांनी आपली भूमिका निभावली.

याचप्रमाणे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे आदरणीय कुलगुरू डॉ. महेश्वरी यांनीही आपल्या वाहन चालकाच्या सेवापूर्तीप्रसंगी असाच आदर्श निर्माण केला. अनेक वर्षे आपली सेवा करणाऱ्या वाहन चालकाला आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्वतः वाहन चालवून घरी सोडण्याचा सन्मान त्यांनी दिला. पदाचा मोठेपणा बाजूला ठेवून मानवी नात्यांचा सन्मान करणारी ही कृती सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.

या दोन्ही मान्यवर अधिकाऱ्यांच्या कृतीतून नेतृत्व म्हणजे केवळ अधिकार नव्हे, तर सहकाऱ्यांप्रती आदर, कृतज्ञता आणि संवेदनशीलता असल्याचा संदेश समाजाला मिळतो. अशा कृतींमुळे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील नाते अधिक दृढ होते आणि समाजासमोर आदर्श निर्माण होतो. खरोखरच, पद मोठे असणे महत्त्वाचे नाही; तर त्या पदाला माणुसकीची उंची प्राप्त करून देणे महत्त्वाचे असते.

शब्दांकन-सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.एस.टी.सोनवणे पिंपळनेर,ता साक्री,धुळे










