

जळगाव दि. १० (प्रतिनिधी) – आदिवासींचे पारंपरिक होळी नृत्य.. मल्लखांबची चित्तथरारक प्रात्यक्षिके.. सालदार मंडळींचे उत्स्फूर्त पावरी नृत्य… अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांची लेझीमवर गणेशवंदना… वृषभराजाची भव्य सवाद्य मिरवणूक… अशा कृषीसंस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या पोळा सण जैन हिल्स येथे थाटामाटात साजरा झाला.

या सोहळ्याला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विजय माहेश्वरी, जळगावच्या महापौर दीपमाला काळे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, प्रकुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदोर मावोजो, राजेंद्र मयूर, उपमहापौर मनोज चौधरी, हिमाचल प्रदेश हॉर्टिकल्चर विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. सोमदेव शर्मा, आंतरराष्ट्रीय आंबातज्ज्ञ डॉ. रामचंद्र गुंजाटे, लिंबू वर्गीय फळ संशोधक डॉ. मिलींद लदानिया, डॉ. जयवंत नागुलकर, डॉ. कल्याणी नागुलकर, जयपूरच्या तनिष्का चौधरी, स्वरूप लुंकड, अनिश शहा, पारस राका, विनय पारख, हेमंत कोठारी, नगरसेवक अमर जैन, नगरसेविका वैशाली पाटील, अमित पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

कृषी संशोधन व विकास कार्यक्रमांतर्गत जैन हिल्सच्या कृषि विभागातर्फे आयोजित पोळा उत्सवाप्रसंगी अशोक जैन व ज्योती जैन, निशा जैन, शोभना जैन, डॉ. भावना जैन यांच्यासह जैन परिवाराच्या हस्ते वृषभराजाचे पुजन करण्यात आले.

जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय भवरलालजी जैन (मोठेभाऊ) यांनी पारंपरिक पद्धतीने पोळा सण साजरा करण्याची परंपरा सुरू केली होती. काळाच्या ओघात आधुनिकतेचा स्वीकार करताना आपल्या समृद्ध भारतीय कृषीपरंपरा आणि संस्कृतीशी नव्या पिढीचे नाते दृढ राहावे, त्यांना या परंपरांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा आणि कृषीसंस्कृतीतील बैलांचे महत्त्व समजावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. त्यानुसार जैन हिल्सवर पोळा साजरा केला जातो. जैन हिल्स येथील ध्यानमंदिर परिसरात कृषी संशोधन प्रात्यक्षिक केंद्राच्या शेती विभागातील विविध ठिकाणच्या सालदार मंडळींनी आपल्या बैलांना एकत्र आणून पारंपरिक पद्धतीने सजविले. बैलांना रंगीबिरंगी सजावट, आकर्षक झूल आणि पारंपरिक अलंकारांनी सजवून पोळ्यासाठी तयार करण्यात आले. त्यानंतर ढोल-ताशे आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात वृषभराजांची भव्य सवाद्य मिरवणूक निघाली. श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या स्मृतिस्थळ ‘श्रद्धा ज्योत’ येथे मिरवणूक थांबवून त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मारुती मंदिराचे दर्शन घेत मिरवणूक सरस्वती पॉईंट, गुरुकुल पार्किंग मार्गे पुढे जात जैन हिल्सच्या हेलीपॅड मैदानावर पोहोचली. हेलीपॅडच्या विस्तीर्ण मैदानावर पोहोचल्यानंतर वातावरणात उत्साहाचा नवा रंग भरला. डॉ. विजय माहेश्वरी, अशोक जैन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते धवल ध्वज फडकावून बैल पोळा उत्सवाची सुरुवात करण्यात आली.

आदिवासी पारंपरिक नृत्य आणि मल्लखांबची थरारक प्रात्यक्षिके

पारंपरिक वेशभूषेतील सालदारांचे नृत्य, आदिवासी बांधवांचे बहारदार पारंपरिक नृत्य आणि मल्लखांबच्या थरारक प्रात्यक्षिकांनी पोळा उत्सवात रंगत भरली. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळच्या जंगल परिसरातून आलेल्या ३५ आदिवासी बांधवांच्या समूहाने सादर केलेल्या पारंपरिक होळी नृत्याने उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. पारंपरिक वेशभूषेतील त्यांच्या उत्स्फूर्त होळी नृत्याने लोकसंस्कृतीचे मनोहारी दर्शन घडवत उपस्थितांची मने जिंकली. अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्यातून मंगलमय वातावरण निर्मिती केली. विद्यार्थ्यांच्या सुरेल आणि देखण्या कलाविष्काराला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली. यानंतर एकलव्य ग्रुपच्या ५ ते १५ वर्षे वयोगटातील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या चित्तथरारक मल्लखांब प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. धाडस, कौशल्य, शारीरिक चपळता आणि आत्मविश्वास यांचा अप्रतिम मिलाफ असलेल्या या प्रात्यक्षिकांनी वातावरणात रोमांच निर्माण केला. परंपरा, कृषीसंस्कृती, लोककला आणि आधुनिक शिक्षण यांचा सुरेख संगम घडविणारा हा पोळा उत्सव संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे दर्शन घडविणारा ठरला.

चिंटू गोंड, वाल्मिक शिंदे, सुरेश पावरा यांना पोळा फोडण्याचा मान

पोळाचा आनंद अजून द्विगुणीत व्हावा यासाठी कंपनीचे सह व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्या संकल्पनेने पोळा फोडणाऱ्या सालदारांना रोख पारितोषिक देण्यात येते. यावर्षी २० हजार रुपयांचे रोख पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते वितरीत झाले. त्यात भाऊंची सृष्टी येथील सालदार चिंटू नवलसिंग गोंड यांना पहिला मान मिळाला. गोशाळेचे सालदार वाल्मीक शिंदे यांना दुसरा मान मिळाला तर जैन सोसायटीचे सालदार सुरेश गरेसिंग पावरा यांना तिसरा मान मिळाला. किशोर कुळकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

मान्यवरांच्या हस्ते सालदारगडींचा सपत्नीक सन्मान

जैन इरिगेशनच्या कृषी विभागाचे काम विविध साईटवर चालते. वर्षभर शेतात राबणाऱ्यांचा सन्मान करण्याची प्रथा अव्याहत सुरू ठेवली आहे. जैन इरिगेशनमधील सर्व सालदारगडींचा भेटवस्तु देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला. अशोक जैन, ज्योती जैन, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, जि. प. सीईओ करिश्मा नायर, मनपा आयुक्त आदित्य जीवने, उपवनसंरक्षक सौरेश सहाय, यामिनी शहा, डॉ. अनिल ढाके, डॉ. बि. के., संजय सोन्नजे, अजय काळे, कल्याणी मोहरील यांची उपस्थिती होती. गोविंद बारेला, बाबा मडावी, किशोर शिंदे, वाल्मिक शिंदे, हंसराज जाधव, रणजीत पवार, भगवान सावळे, सुरत ब्राम्हणे, रामसिंग पवार, गजानन पवार, धनसिंग राठोड, अनार पवार, चिंटू गोड, विजय कासार, मन्नु पावरा, मनसाराम पावरा, सोनसिंग राठोड, जगदीश सिसोदिया, दिलीप पवार, सुरेश पावरा, मधुकर केदार, विकास पाटील, रतन साळुंखे, शिवदास राठोड, चेतन वाघमोडे, रामेश्वर सावळे, सागर मोरे, विजय सपकाळे, गणपत शेळके, विशाल राठोड, अंकुश पाटील यांचा सत्कार करण्यात आला.








