<
जळगाव – (विषेश प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा ह्या ना त्या कारणाने संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असतो, कधी वाळू ने तर कधी शालेय पोषण आहार भ्रष्टाचार तर कधी राशन ह्या सर्व घटना ताज्या असतांनाच एका नवीन भ्रष्टाचाराने तोंड वर काढले आहे असे म्हणने वावगे ठरणार नाही.
सविस्तर असे की, जळगाव येथिल माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ता शैलेंद्र जंजिरसिग परदेशी यांनी जळगावातील काही स्वस्त धान्य दुकानदार यांनी गेल्या ५ वर्षात कोट्यावधीचा भ्रष्टाचार केला असल्याची तक्रार दिनांक २१ मे २०१९ रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांच्याकडे दाखल केली आहे.
गेल्या ५ वर्षात या स्वस्त धान्य दुकानदार यांनी कॅश मेमो, स्टॉक बुक, सेल रजिस्टर, व्हिजिट बुक, तक्रार बुक, काहीही ठेवलेले नसुन शासनाचा संपूर्ण माल हा काळ्या बाजारात परस्पर विकला जातो असे तक्रारदार यांनी म्हटले आहे. तसेच या संबधित स्वस्त धान्य दुकानदार यांना माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये अर्ज दाखल करुन माहिती मागितली होती परंतु एकाही स्वस्त धान्य दुकानदाराने माहिती दिलेली नाही यामुळे भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खरा असल्याचा दावा तक्रारदार यांनी केला आहे.
काही स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडील ८० टक्के लाभार्थी हे अस्तित्वातच नाही तरी देखील या स्वस्त धान्य दुकानदारांना १०० टक्के माल कसा मिळतो? नक्कीच यात पुरवठा विभागातील काही भ्रष्ट अधिकारी यांचा समावेश असु शकतो. या प्रकरणात स्वतः जिल्हा पुरवठा अधिकारी लक्ष देतील का?
या प्रकरणी विभागिय आयुक्त कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला सदर प्रकरणी नियमानुसार चौकशी करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणी चौकशी करण्या करिता जळगाव तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक डि. बी. जाधव व श्री. तडवी यांची नेमणूक करण्यात आली आहे. पुरवठा निरीक्षक डि. बी. जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की ३ स्वस्त धान्य दुकानदार यांची चौकशी पूर्ण झाली असून इतर काही दुकाने या आठवड्यात चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीत नेमके काय समोर येणार याकडे लक्ष वेधले आहे.
पुढील भागात अजुन सविस्तर वाचा कोट्यावधीचा भ्रष्टाचार करणारे ते स्वस्त धान्य दुकानदार नेमके कोण? चौकशी अहवालात काय? सविस्तर लवकरच घेऊन येत आहे सत्यमेव जयते.