<
जळगाव- (चेतन निंबोळकर) – गावातील तंटे गावातच सोडविण्यासाठी तंटामुक्त गाव समितीची स्थापना करण्यात आली खरी मात्र, आजघडीला गावागावात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. त्यामुळे या अवैध धंद्यांमुळे गावे तंटामुक्त कशी होणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
गावागावात शांतता नांदावी, बंधुभाव निर्माण व्हावा, जातीय व सामाजिक तेढ कमी व्हावा, आपआपसातील भेदभाव कमी होऊन समाजात संघटन शक्ती निर्माण व्हावी व गावाचा सर्वांगीण विकास साधला जावा, या उदात्त हेतूने राज्य शासनाने १५ आगस्ट २००७ पासून तंटामुक्त अभियान सुरू केले. या अभियानाला भावनात्मकदृष्ट्या महत्त्व यावे म्हणून महात्मा गांधी यांचे नाव देण्यात आले. गावागावात तंटामुक्त समित्या स्थापन करण्यात आल्या. अभियान सुरू होऊन १२ वर्षाचा काळ लोटला. तेव्हा पासून गावागावात तंटामुक्त समित्या स्थापन झाल्या असल्या, तरी प्रत्यक्षात मात्र बहुतेक गावात अवैध धंदे सुरू असल्याने गावे तंटामुक्त कशी होणार ? असा प्रश्न नागरिकांकडून केल्या जात आहे.
शांततेकडून समृद्धीकडे जाण्याची वाट, हेच उद्धिष्ट गाव तंटामुक्त होण्यासाठी शासनाने ठेवले आहे. व्यसनात अमाप पैसा खर्च होतो, सज्जनांचे जगणे हराम होऊन, दुर्जनाची दिवाळी व सूडप्रवृत्तीची होळी, अशी दुरावस्था प्राप्त होते. म्हणून गावे तंटामुक्त करण्यासाठी तंटा निर्माण करणारे धंदे गावागावातून हाकलून लावावी. याकरिता गावकऱ्यांना पोलीस विभागाचे सहकार्य आवश्यक आहे. मात्र, पोलीस विभागच या अवैध धंद्यांना खतपाणी घालत असल्याने गावागावात अवैद्य धंदे राजरोसपणे सुरू असून पोलीस विभागाच्या सहकार्याशिवाय गावे तंटामुक्त होणार नाही, असे जाणकार नागरिक व तंटामुक्त समितीचे सदस्यांकडून बोलल्या जात आहे. काही पोलीस कर्मचारी कारवाईचा आव आणत कारवाई न करता अवैद्य धंदेवाल्यांना परस्पर सोडून देत असल्याचे प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. अवैद्य धंदे तंटामुक्त गाव होण्याला अडसर धरत असल्याची चर्चा होवू लागली आहे.