<
जळगांव(प्रतिनीधी)- शहरातील अस्वच्छतेची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यात शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठा, शाळा आणि धार्मिक स्थळांच्या परिसरात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. दुर्गंधीमुळे बाजारपेठांतील व्यापारी आणि शाळांतील विद्यार्थ्यांना आजाराची लागण होण्याची भीती व्यक्त होत आहे. शहरात वाहतूक कोंडी, अस्वच्छता यांसह अनेक समस्यांचा डोंगर उभा राहत असून यात शहरातील अस्वछतेची समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. मात्र या समस्येला महानगरपालिकेसह शहरातील उघड्यावर कचरा टाकणारे नागरिकही तेवढेच जबाबदार आहेत. शहरातील काही भागात साचलेला आणि कुजलेला कचरा उचलण्याची गरज वाटत नसल्याने शहरात यामुळे येत्या दिवसांत आणखी आजारांचा आणि साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांबाहेरही कचरा साचत असून, तोही उचलला जात नसल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जळगांव शहरात गेल्या अनेक दिवसांपासून स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. या ठिकाणी शहरातील काही भागात स्वच्छता केली जाते. व अन्य ठिकाणी मात्र, महिन्यातून एक वेळेस स्वच्छता केली जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. अशा तक्रारी वारंवार नगरपालिकेत देऊनही नगरपालिका याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं नागरिकांचा म्हणणं आहे.
शहराच्या स्वच्छतेबाबत मनपा ठरतेय असमर्थ
‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत जळगांव शहर महानगरपालिकेने स्वच्छतेची मोहीम हाती घेतली असली तरी स्वच्छताविषयक कामात ठोस अशी कामगिरी पालिकेला बजावता आलेली नाही. ‘स्वच्छ व सुंदर शहर’ हे केवळ सांगण्यापुरते असून प्रत्यक्षात परिस्थिती विपरीत आहे. प्लास्टिकमुक्ती कागदावरच आहे. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून एकदिवसीय स्वच्छता महोत्सव साजरा झाला खरा, मात्र प्रत्यक्षात हा स्वच्छतेचा देखावा असून दिव्याखाली अंधारच आहे.जळगांव शहरात महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छताविषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. अनेक संस्था, संघटना हिरिरीने सहभागी झाल्या. महापालिकेची यंत्रणा तर कित्येक दिवसांपासून याच कामात आहे. तसेच राजकीय पक्षही या मोहिमेत उतरले. त्यामुळे खऱ्या अर्थाने शहरात ‘स्वच्छतेचा महाउत्सव’ पार पडल्याचे चित्र किमान या दिवशी तरी दिसून आले. “स्वच्छ शहर सुंदर शहर” मुद्दा डोळय़ांसमोर ठेवून महापालिकेने अनेक उपक्रम राबवले. त्याचा कितपत उपयोग झाला, याविषयी खात्रीने सांगता येणार नाही. कारण, आजही स्वच्छतेच्या नावाने शहरभर ओरड कायम आहे. स्वच्छतेच्या विषयावरून नागरिक समाधानी नाहीत. आरोग्य व स्वच्छतेच्या कामावर नियुक्त करण्यात आलेले बहुतांश अधिकारी व कर्मचारी निर्ढावलेले आहेत. शहरात एकीकडे काही सामाजिक संघटना स्वयंस्फूर्तीने स्वच्छता मोहीम राबवत शहरातील अस्वच्छतेच्या समस्येविरुध्द लढत आहेत. मनपा प्रशासनाला मात्र शहरातील समस्यांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.
शाळकरी मुलांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण
पोटच्या जीवाला शाळेत दाखल करताना पालक निश्चिंत असतात. त्यांना विश्वास असतो की आपल्या पाल्याला आपण सुरक्षित शाळेत पाठवत आहोत; पण जळगाव शहरातील महानगरपालिकेच्या बर्याच शाळांचे मात्र तिन-तेरा वाजले असून त्या स्वच्छतेच्या बाबतीत असुरक्षित झाल्याचे दिसून येत आहे. महानगरपालिकेच्या बर्याच शाळांमध्ये कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. अनेक पालकांनी शाळा प्रशासनाकडे तक्रार केल्यावरही शाळा प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याची पालकांची तक्रार आहे. विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या स्वच्छता गृहांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून गटारी तुंबल्याने स्वच्छतागृहात प्रवेश करणेही कठीण झाले आहे.
लोकप्रतिनिधी एकमेकांच्या अंगावर जबाबदारी ढकलण्यात व्यस्त
एका सुजाण नागरिकाने निवडून आलेल्या स्थानिक लोकप्रतिनीधीला कचऱ्याचा समस्यांबाबत फोन केला असता त्यांनी सांगितलं की आमदार साहेब प्रचारात व्यस्त असल्याने त्या कचऱ्याची सफाई २४तारखेनंतर होईल. असे केविलवाणं उत्तर देऊन आपल्या अंगावरची जबाबदारी ढकलून मोकळे झाले आहेत .