<
जळगांव(प्रतिनीधी)- स्वर्गीय वसंतराव चांदोरकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने आयोजित दिवाळीच्या पाडवा पहाट ही मैफल स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान व मधुमालती बहुउद्देशीय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कांताई सभागृहात संपन्न झाली. या मैफिलीस भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनचे सहकार्य लाभले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित आमदार माननीय राजूमामा भोळे शहराच्या प्रथम नागरिक व महापौर सौ सीमाताई भोळे यांच्यासोबत अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ निशाभाभी जैन तसेच मधुमालती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी हे उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन जळगाव आकाशवाणीच्या नैमित्तिक उद्घोष शिका सौ रश्मी कुरंभट्टी यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिष्ठानच्या परंपरेप्रमाणे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांच्या गुरु वंदनेने झाली. गायत्री जोशी या पुणेस्थित उदयोन्मुख व आश्वासक गायिका असून त्यांना या कार्यक्रमात तितकीच ताकदीने संवादिनी साथ नाशिक येथील सागर कुलकर्णी व तबल्याची साथ पुणे येथील सौरभ क्षीरसागर यांनी केली. सर्वप्रथम गायत्री जोशी यांनी जौनपुरी रागात विलंबित रूपक तालात निबद्ध बडा ख्याल “री मैं ना जानू” तर द्रुत एकतालात निबद्ध बंदिश “भनक सुनी आवन की अत्यंत ताकदीने सादर केली. त्यानंतर “स्मरत मनि राम गौरीहराला” हे नाट्यपद सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. मीरा रचित एक भजन सादर केले “म्हारा बाल गिरिधारी” या भजनानंतर “या रे नाचू प्रेमानंदे” हा अभंग सादर केला. संगीत ययाती आणि देवयानी या नाटकातील “देवाघरचे ज्ञात कुणाला” या नाट्य पदाने मैफिली वर अत्यंत मजबूत पकड प्रस्थापित केली. परत एकदा संत मीराबाईचे भजन “सुनो हे सोनू” सादर केले. या भजनानंतर “बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल” हा अभंग सादर केला गायत्री जोशी यांनी आपल्या मैफिलीची सांगता किशोरिताई अमोणकर यांच्या “अवघा रंग एकचि झाला” या भैरवीने केली रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद व दाद पाडवा पहाट या प्रात:कालीन मैफिलीला मिळाला. गेल्या आठवड्यात प्रतिष्ठानच्या वतीने आकाशकंदील बनविण्याचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे नाव “कलेतून निर्मितीकडे” असे देण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिरात सुमारे ६० विद्यार्थी व हौशी पालकांनी भाग घेतला होता. मल्हार कम्युनिकेशनचे सर्वेसर्वा श्री. आनंद मल्हारा यांनी उद्घाटन समारंभा प्रसंगी असे जाहीर केले होते की या प्रशिक्षण शिबिरात शिकवल्या गेलेल्या कंदीलां मध्ये जो कलाकार आपली अजून क्रिएटिविटी दाखवेल अशा कलावंतांना मल्हार कम्युनिकेशन कडून प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येईल. यामध्ये सर्वोत्कृष्ट कंदील बनवणारा स्पर्धक जयादित्य बाकरे व कल्पना भावसार या दोघांची निवड करण्यात आली. तसेच चांदोरकर प्रतिष्ठान तर्फे यज्ञेश जोशी व अनुश्री सोमाणी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.प्रतिष्ठानचे सचिव अरविंद देशपांडे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास वरुण देशपांडे, अमित माळी, जुइली कलभांडे, सरिता महाजन, मयुर पाटील, स्वानंद देशमुख, निनाद चांदोरकर, माधव पोतनीस, अनघा देशपांडे यांचे बहुमोल सहकार्य लाभले.