<
जळगांव(प्रतिनीधी)- महाराष्ट्रात सध्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून यामुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. बळीराजाच्या तोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावला गेला आहे. यामध्ये शेतकरी हा पुर्णतः ढासळला गेला असून यामुळे बळीराजाला विविध स्तरांतून उभारी देण्याची नितांत गरज आहे. अस्मानी संकटामुळे आपल्या पाल्यांचे शिक्षण कसे करावे हि मोठी समस्या बळीराजासमोर भिंत बनून उभी आहे. बळीराजाला शासन स्तरावरून मदत मिळेल परंतु कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शिकत असलेली मुलं ही बहुतांश ग्रामीण भागातील असून शेतकर्यांचे पाल्य आहे. तरी विद्यापीठाने या विद्यार्थांची २०१९-२० या शैक्षणीक वर्षाची फि माफ केली तर या दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या पाल्यांचे पुढील शिक्षण योग्य प्रकारे होऊ शकेल. सन २०१९-२० ची शैक्षणिक फी माफ केल्यामुळे शेतकर्यांची मुले शैक्षणिक प्रवाहात टिकतील. मुंबई विद्यापीठाने त्यांच्या विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे तर पुणे विद्यापीठातही या संदर्भात निर्णय प्रक्रिया सुरु असून आपल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांची सन २०१९-२० शैक्षणीक फी माफ करावी, असे दर्जी फाऊंडेशन च्या वतीने कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु यांना यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी कुलगुरु पी.पी. पाटील यांच्यासह राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन सदस्य दिलीप रामू पाटील, दर्जी फाऊंडेशचे संचालक गोपाल दर्जी पाटील, प्रविण पाटील, दिनेश पाटील, तुषार तायडे, विजय गायकवाड आदी उपस्थित होते.