<
जळगाव.07, संविधान साक्षर ग्राम अभियानांतर्गत 26 नोव्हेंबर या संविधान दिनानिमित्ताने 26 नोव्हेंबर 2019 रोजी प्रत्येक जिल्ह्यातील 02 गावांना दत्तक घेवून त्या गावांमध्ये संविधानाविषयी जनजागृती करून गावातील प्रत्येक व्यक्तीला संविधान विषयक माहिती करून देवून ते गाव 100 टक्के संविधान साक्षर गाव करण्याचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या संथेमार्फत आयोजित केला आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या संस्थेमार्फत आयोजित संविधान साक्षर ग्रामच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील पातारखेडे ता.एरंडोल व खेडी बु.ता.जळगाव ही 2 गावे दत्तक घेतली असून दत्तक गावांमध्ये संविधानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी संथेने पाताखेडेसाठी 1) अर्जुन गायकवाड 2) शांतराम हटकर 3) महेंद्र मराठे 4) नीतीन भोई 5) स्नेहा बोरसे 6) जयश्री चौधरी 7) शेखअक्रम मुजावर यांची तर खेडी बु.साठी 1) चंद्रकांत इंगळे 2) शिल्पा मालपुरे 3) सरला गाढे 4) युसुस तडवी 5) कल्पना बेलसरे 6) अर्चना किरोते 7) सविता चिमकर यांची समतादूत म्हणून नियुक्त केले आहे. संविधान साक्षर ग्राम अभियानाच्या प्रथम बैठकीत गावाची निवड करून गावाची पाहणी करणे,गावाचा सूक्ष्म आराखडा तयार करणे ,गावाचा नकाशा (सुक्ष्म) तयार करून त्याअनुषंगाने सरपंच ,पोलीस पाटील,आशावकर्स,अंगणवाडीसेविका आणि गावातील शाळेच्या मुख्याध्यापकांच्या समन्वयातून गावकऱ्यांची बैठक लावणे व गावकरऱ्यांना भारतीय राज्यघटनेचे महत्व,अंमलबजावणी व कायदेविषयक प्राथमिक स्वरूपातील माहिती देण्यात येईल. संविधान साक्षर ग्राम अभियानाच्या दुसऱ्या बैठकीत गटविकास अधिकारी, तससिलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी, प्रांताधिकारी, गटशिक्षाधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, उप विभागीय पोलीस अधिकारी आणि गावातील शासकीय सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी/कर्मचारी यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. सदर बैठकांचा उद्देश 100 टक्के संविधान साक्षरतेची गरज,प्रचार व प्रसार या विषयावर चर्चात्मक आराखडा तयार करणे असा आहे. गावपातळीवरील बैठकांमधून महाविद्यालयीन युवक- युवती तसेच बचत गटातील महिला, शेतकरी गट, गावातील युवक वर्ग यांच्या विशेष बैठका लावून त्यांच्या समन्वयातून 100 टक्के संविधान साक्षरतेची संकल्पना विषद करणे असा आहे. संविधानाचा प्रचार व प्रसार चांगल्याप्रकारे व्हावा यासाठी महिलांचा सहभाग घेवून विशेष कार्यशाळेतून व्यसनमुक्ती, बचतीची सवय, आरोग्य आणि स्वच्छतेचे महत्व, बेटी बचाव बेटी पढाओ साक्षरता इ. विषयांवर प्रबोधपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. भारतीय संविधान आणि मुलभुत अधिकार या विषयातील तज्ञ आणि विविध विभागातील शासकीय अधिकारी घरा-घरांपर्यंत पोहचून भारतीय राज्य घटनेचे प्रास्ताविक भिंतीवर लावतील.तसेच शाळांमधून संविधानाचे नियमित वाचन घेणे, कोनशिला तयार करणे, पत्रकार परिषदा घेणे, वेगवेगळया प्रसार माध्यमांद्वारे प्रचार व प्रसार करणे ,विविध मान्यवर ,विचारवंत, अभ्यसक लेखक, यांच्या गावभेटींचे आयोजन करून संविधानाचे महत्व समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम या अभियांतर्गत केले जाणार असल्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे संस्थेचे महासंचालक श्री. कैलास कणसे,मुख्य प्रकल्प संचालिका श्रीमती प्रज्ञा वाघमारे तसेच बार्टीच्या जिल्हा प्रकल्प अधिकारी श्रीमती भाग्यश्री अर्जुन पाईकराव यांनी एका संयुक्त पत्रकान्वये केले आहे.