सरपंच, ग्रामसेवकांकडून निधी खर्चाबाबत उदासिनता
दिव्यांग बांधवांची उडविली जातेय खिल्ली
जळगाव-(विषेश प्रतिनिधी)-तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत दिव्यांग निधी येवून पडला आहे. मात्र अद्याप पावेतो सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या उदासिनतेमुळे हा निधी दिव्यांग बांधवांवर खर्च केला जात नसल्याच्या अनेक तक्रारी शासन दरबारी आल्या असून याची दखलदेखील अद्याप शासनाकडून घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान दिव्यांग व्यक्तीला सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगता यावे, त्याची प्रगती व्हावी, यासाठी शासन प्रत्येक गावासाठी अपंग निधी देत असतो. मात्र तालुक्यातील असे काही गावं आहेत की ते हा निधी गावात दिव्यांग व्यक्ती असल्यावरदेखील खर्च करत नाही. काही गावातील सरंपच आणि ग्रामसेवकांनी तर चक्क हा निधी इतरत्र खर्च केल्याचा प्रकार देखील मागील काळात समोर आला आहे.
तालुक्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीने हा निधी दिव्यांग बांधवांसाठी योग्य काळात त्यांच्या जीवनमान उंचविण्याकरिता खर्च करावा अशा आशयाचे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी शासन दरबारी पत्रव्यवहार देखील केलेला आहे. असे असतांना याची दखल का घेतली जात नाही. असा प्रश्न आता सुज्ञ नागरिक उपस्थित करीत आहे. शासनस्तरावरुनच जर दिव्यांग व्यक्तींची फरपट होत असेल तर त्यांना भक्कम बनवून त्यांचे जीवनमान उंचवणे या शासनाच्या मुख्य हेतूला डाग लागल्याशिवाय राहणार नाही.
बीडीओ याप्रकाराकडे लक्ष देतील का?
तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींनी अपंग निधी खर्च केला नाही. अशा ग्रामपंचायतींवर गटविकास अधिकारी काय कारवाई करणार असा सवाल आता दिव्यांग बांधव विचारु लागले आहेत. वरिष्ठ अधिकार्यांना याकडे जातीनं लक्ष घालावेच लागेल तर दिव्यांग बांधवांना न्याय मिळेल व ते सामान्य व्यक्तींप्रमाणे जीवन जगू शकतील.