<
जळगाव(प्रतिनीधी)- उद्योजकांच्या सोयीसुविधा मध्ये वाढ व्हावी यासाठी आमदार राजू मामा भोळे यांनी एकीकडे सत्ताविस कोटींचे कामे मंजूर करून आणली . त्यासाठी मोठा पाठपुरावा केला. तर दुसरीकडे एमआयडीसी मधील प्लॉट देणे असो शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा चिरीमिरी घेतल्या शिवाय तुम्ही काम करीत नाही. आपल्या कामाच्या पद्धतीत सुधारणा करा. उद्योजकांच्या अडीअडचणी वाढत असून आमच्या संयमाचा अंत पाहू नका अशी तंबी खासदार उन्मेश पाटील यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना दिली आहे. जळगाव एमआयडीसी मधील उद्योजकांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी आज जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने खासदार उन्मेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खासदार उन्मेश पाटील आणि आमदार राजू मामा भोळे यांनी क्षेत्रीय अधिकारी अमित भामरे यांच्या कारभारातील अनियमिततेबाबत झाडाझडती घेतली. आज दुपारी तीन वाजता बाजार समितीच्या समोरील अजिंठा लॉन्स येथे ही सभा सुरू झाली . खासदार उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीस उद्योग आघाडीचे कंवरलाल संघवी, अरुण बोरोले,चंद्रकांत बेंडाळे,किशोर ढाके,बिपिन पाटील, समीर साने, समीर राणे, नितीन इंगळे ,एमआयडीसी क्षेत्रीय अधिकारी अमित भामरे , गिरीसाहेब, जिल्हा उद्योग केंद्राचे साहेबराव पाटील,एम एस ई बी, बी एस एन एल , एम आय डी सी , प्रदूषण नियंत्रण बोर्ड, जिल्हा उद्योग केंद्र, महावितरण, कामगार कल्याण,अग्निशामक यंत्रणा अधिकारी यांच्यासह विविध वीस विभागांचे अधिकारी तसेच मोठ्या उद्योजक बांधव संख्येने उपस्थित होते.गेल्या पाच वर्षात विविध कामे करून एम आय डी सी मधील उद्योग वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केला. मोठा निधी मंजूर करून आणला. मात्र अधिकाऱ्यांनी आपल्या स्वार्थासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने कुठलीही सुसूत्रता ठेवली नाही.संवाद ठेवला नाही त्यामुळे चांगले काम करून ही उद्योजक बांधवांची नाराजी मला झेलावी लागली . तुम्ही अजूनही आपल्या कार्यपद्धतीत बदल करा अन्यथा मला गंभीर दखल घ्यावी लागेल असा दम आमदार राजू मामा भोळे यांनी भरला तेव्हा बैठकीत शांतता पसरली होती. बुधवार गुरुवारी अधिकारी मुख्यालयात थांबा एमआयडीसी तील अडीअडचणी बाबत उद्योजक अधिकारी यांना भेटावयास येतात त्यावेळी अधिकारी भेटत नसल्याचे तक्रार उद्योजकांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या समोर मांडली. त्यावर खासदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला यावेळी क्षेत्रीय अधिकारी भामरे निरुत्तर झाले. मुख्यालयात थांबून बुधवार गुरुवार उद्योजकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी आपण उपलब्ध राहवे. अशी तंबी दिली. यावेळी अनेक विषयांवर उद्योजक बांधवांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.