<
जळगाव – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे होणार्या 59 व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धांना आज (दि.15) पासून सुरुवात होणार आहे. सायंकाळी 6.30 वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. महानगरपालिकेचे आयुक्त उदय टेकाळे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षा अॅड.रोहिणीताई खडसे खेवलकर व ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी प्रमुख पाहुणे राहतील, अशी माहिती स्पर्धेच्या समन्वयक सरिता खाचणे यांनी दिली.
आज (दि.15) रोजी सायंकाळी 6.30 वाजता उद्घाटन झाल्यानंतर लगेचच 7 वाजता उत्कर्ष कलाविष्कार भुसावळचे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या नाटकाचा प्रयोग होणार आहे.राज्य नाट्य स्पर्धेच्या जळगाव केंद्राच्या या प्राथमिक फेरीत दि. 15 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत एकूण 21 नाटके सादर होणार आहे. दररोज सायंकाळी 7 वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सायंकाळी सात वाजता सादर होणार्या या नाटकांमध्ये जळगाव, भुसावळ, धुळे व इंदौर येथील नाटकांचा समावेश आहे. त्यामुळे ही स्पर्धा म्हणजे नाट्यरसिकांना पर्वणीच ठरणार आहे.
स्पर्धेसाठी नाममात्र म्हणजे फक्त १५/- व १०/- तिकीट दर आहे. या रक्कमेतून अर्धी रक्कम नाटक सादर करणाऱ्या संस्थला दिली जाते. जळगांव कर रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने या मेजवानी च आनंद घ्यावा, आणि या हौशी कलाकारांच्या कलेला आवर्जून दाद द्यावी, असे आवाहन समन्वयिका सरिता खाचणे यांनी केले आहे.