<
मुंबई-(प्रतिनिधी) – भारतातील कृषि व सूक्ष्मसिंचन क्षेत्रातील अग्रणी व जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जैन इरिगेशन सिस्टिम्सने आर्थिक वर्ष 2019-20च्या दुसऱ्या तिमाहीचे लेखापरीक्षण न केलेले एकल व एकत्रित निकाल मुंबई येथे 14 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत जाहीर केले.
दुसऱ्या तिमाहीची ठळक वैशिष्ट्ये
एकत्रित उत्पन्न 1388.3 कोटी रुपये आणि कर, व्याज आणि घसारापूर्व नफा 80.4 कोटी रुपये नोंदला गेला. एकल उत्पन्न 395.8 कोटी आणि कर, व्याज आणि घसारापूर्व नफा हा 1 कोटी रूपये झाला. विदेशातील व्यवसाय स्थिर आहे. भारतातील व्यवसायासकठीण रोखीची तरलता परिस्थिती आणि यावेळचा खूप लांबलेला पावसाळा अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. बँकांसोबत कर्ज निराकरणाचे काम सध्या सुरु आहे.
कर्जाचा टक्का कमी करण्याचे उपाय – अनिल जैन
या आर्थिक निकालाबाबत बोलतांना जैन इरिगेशन सिस्टीमस लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष अनिल जैन म्हणाले, “या वर्षाची दुसरी तिमाही कंपनीसाठी खूप आव्हानात्मक ठरली. कंपनी या कठीण परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी खूप परिश्रम घेत आहे. अनेक उपाय योजत आहे. पहिल्यांदा कंपनी येणेकऱ्यांकडून पैसे वसूली व विक्रेते यांचे नियोजन करीत आहे. दुसऱ्या उपायात कंपनी भारतीय कंपनी कायद्यानुसार बँकांबरोबर व्यवहार करत आहे. तिसरे म्हणजे कंपनीच्या कर्जांचा ताळेबंदातील टक्का कमी करणे हा उपाय कंपनी करत आहे. गत आर्थिक वर्षाच्या तुलनेत विदेशातील व्यवसायात स्थिरता आहे आणि त्यात एकूण 10 टक्के वाढ झालेली दिसते आहे.”
कंपनी खूप कठीण परिस्थितीत आहे पण कंपनीकडे यातून मार्ग काढण्यासाठी संसाधने उपलब्ध आहेत. कंपनी त्यांचा योग्य वापर करून लवकरच या परिस्थितीतून बाहेर येईल. कंपनीच्या व्यवसायाचा खूप चांगला इतिहास आहे. तसेच कंपनी ताळेबंद सुधारण्यासाठी विविध उपाय वापरत आहे आणि त्याच वेळी चांगल्या (ऑर्डरींच्या) मागण्यांची पूर्ततेची अंमलबजावणी करीत आहे. कंपनी कमी खेळते भांडवल लागणाऱ्या व्यवसायात वाढ करीत आहे. कंपनीच्या उत्पादनांची मागणी ही भारत सरकारने घेतलेल्या कृषी, जल, सिंचन, रस्ते, नैसर्गिक वायु, अन्नप्रक्रिया या क्षेत्रातील विविध सुधारणांमुळे वाढतच आहे. कंपनीच्या भागधारकांचा कंपनीला पाठिंबा कायम आहे आणि कंपनी त्यांना धन्यवाद देते.