<
जळगांव(प्रतिनीधी)- येथील माजी नगरसेवक शिरसाळे मेहरुण परिसरात त्यांच्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी दुपारी गेले असता त्यावेळी त्यांना एक गृहस्थ बेशुद्धावस्थेत रस्त्यावर पडलेला दिसला. त्याला त्यांनी उठविले असता ते काहीच बोलत नव्हते. यामुळे शिरसाळे यांनी बांधकाम व्यावसायिक विलास यशंवते, पंकज सपकाळे या मित्रांना बोलावून या अनोळखी व्यक्तीस एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेले. तेथे त्यांनी पोलिसांना सर्व घडलेली हकिगत सांगून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या खिशात असलेल्या ओळखपत्रावरून ते नागपूर येथील रामबाग भागातील भालचंद्र बळिराम मेश्राम असल्याचे स्पष्ट झाले. लागलीच यशवंते यांनी त्यांच्या नागपूरच्या सहकारी मित्राकडून त्यांचा नागपूर येथील कुटुंबीयांचा फोन नंबर मिळवून संपर्क साधला असता, त्यांचे कुटुंबीय नाशिकला गेल्याचे समजले, यशवंते यांनी त्यांच्या कुटुंबीयांना सर्व घडलेली घटना सांगितली. त्यांचे कुटुंबीय सायंकाळी नाशिकवरून जळगावला येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या कृतीतून माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय आला. यशवंते व त्यांच्या सहकार्यांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.