<
जळगाव, दि. 19 – जिल्हयात विविध खेळांचा प्रसार होण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात देण्यात येणाऱ्या सुविधांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे असावेत. जेणेकरुन सर्वसामान्य क्रीडाप्रेमींना या सुविधांचा वापर करता येईल. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले. जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची आढावा बैठक त्यांच्या दालनात संपन्न झाली. या बैठकीस जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे, जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित यांचेसह समितीचे सदस्य व प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, जिल्ह्यात खेळाचा प्रसार होण्याबरेाबरच चांगले खेळाडू निर्माण होण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यासाठी क्रीडा विभागाने आवश्यक तो आराखडा निर्माण करावा. क्रीडा संकुलात खेळाडूंना ज्या सुविधा पुरविण्यात येतात. त्यांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे असावेत. खेळाडूंना चांगले प्रशिक्षक लाभले तर ते आपले नैपूण्य दाखवू शकतात तसेच खेळाडूना दैनदिन सरावासाठी क्रीडा संकुलातील सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. यासाठीही क्रीडा विभागाने प्रयत्न केले पाहिजेत . या बैठकीत जिल्हा व तालुकास्तरावरील क्रीडा संकुलाचाही आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. तालुकास्तरावरील क्रीडा संकुलाची कामे लवकरात लवकर व चांगल्या दर्जाची होण्यासाठी क्रीडा विभागाने दैनंदिन भेटी देणे आवश्यक आहे. या बैठकीत जिल्हा क्रीडा संकुलातील जुन्या व्यापारी गाळयांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच खेळ सुविधा वापराचे नियमावलीत सुधारणा करणे, मॅट/बॉक्सींग रिंग वापराचे दर निश्चित करणे, क्रीडा संकुलातील खोल्यांच्या वापर आदि विषयांवर चर्चा करण्यात आली.