मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानकात ओव्हरहेड वायरवर झाड पडल्याने मध्य रेल्वेची सीएसएमटीकडून कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुलुंड स्थानकातल्या फलाट क्रमांक १ वर असलेल्या ओव्हरहेड वायरवर झाड पडल्याने धीम्या मार्गाची डाऊन लोकल वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. शनिवारी सीएसएमटीहून कल्याणच्या दिशेने निघालेल्या आणि जाणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसतो आहे.
धीम्या मार्गावर झालेल्या या घटनेमुळे लोकल्स जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. डाऊन दिशेच्या लोकल वाहतुकीवर परिणाम झाला असून त्याचा परिणाम काही वेळात अप दिशेच्या लोकल्सवरही होणार आहे. त्यामुळे आजही मुंबईकरांना खासकरून मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खोळंबा सहन करावा लागणार आहे. प्रवाशांना होणाऱ्या असुविधेसाठी आम्ही दिलगीर आहोत ही घोषणा सेंट्रल मार्गाने प्रवास करणारे प्रवासी आजही वारंवार ऐकणार आहेत.
सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जेव्हा हे झाड ओव्हरहेड वायरवर पडले त्यावेळी लोकल स्थानकात उभी होती. ओव्हरहेड वायर तुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाला आहे. जोपर्यंत झाड कापून वायर मोकळी केली जाणार नाही तोपर्यंत ही लोकल ट्रेन हलवता येणार नाही.