<
तीन महिन्यापेक्षा अधिककाळ धान्य न घेतलेल्या कुटूंबाच्या शिधापत्रिका रद्द करा –डॉ. नंदकुमार बेडसे
जळगाव, दि. 3 – तीन महन्यापेक्षा अधिक काळापासून ज्या शिधापत्रिकेवर धान्य घेतले नसेल. अशा शिधापत्रिका धारकांची चौकशी 31 डिसेंबरपूर्वी करुन या शिधापत्रिका रद्द करण्याची कार्यवाही पुरवठा विभागाने तातडीने सुरु करावी. अशा सुचना प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी आज दिल्यात. जिल्हास्तरीय दक्षता समितीची मासिक बैठक आज प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. बेडसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली. या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी, जी. पी. इरवतकर यांचेसह अशासकीय सदस्य सुनिल जावळे, महेंद्र बोरसे, रामकृष्ण पाटील, डॉ. श्रीमती. अर्चना पाटील उपस्थित होते. यावेळी डॉ. बेडसे म्हणाले की, जिल्ह्यात अंत्योदय योजनेतंर्गत अनेक लाभार्थी त्यांचे धान्य घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. असे लाभार्थी त्या गावात राहतात किंवा कसे याबाबतची चौकशी 31 डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्यात यावी. जे लाभार्थी राहत नाही, बोगस आहेत अथवा त्यांची दुबार नावे आहेत. या कारणामुळे धान्य घेत नसतील तर त्यांची नावे लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्यात यावी. जेणेकरुन नवीन लाभार्थ्यांचे नाव या योजनेत समाविष्ठ करणे शक्य होईल. नवीन लाभार्थी निवडताना ग्रामसभेचे ठराव घेऊन नाव समाविष्ठ करावे. तसेच यामध्ये गरीब व गरजू लाभार्थ्यांचाच समावेश करावा अशा सुचनाही डॉ. बेडसे यांनी दिल्या. तसेच स्वत धान्य दुकानदारांना वेळेत धान्य पोच होत नसल्याची तक्रार अशासकीय सदस्यांनी बैठकीत केली असता धान्य वाहतुक ठेकेदारांनी विहित वेळेत धान्य दुकानदारांकडे पोच होईल याची दक्षता घेण्याच्या सुचनाही ठेकेदारास देण्याबाबतचे निर्देश डॉ बेडसे यांनी दिले. जिल्ह्यात 6 लाख 597 कुटूबांना धान्य वितरीत करण्यात केले जाते. परंतु यापैकी 87 टक्के लाभार्थीच धान्य घेतात. उर्वरित 13 टक्के लाभार्थी धान्य घेण्यास येतच नाही. त्यामुळे धान्य दुकानदारांकडे धान्य शिल्लक राहते. लाभार्थ्यांनी आपल्या कुटूंबातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड नंबर देणे आवश्यक आहे. परंतु अनेक रेशनकार्डधारकांनी अद्यापही आपल्या कुटूंबातील सदस्यांचे आधारकार्ड नंबर दिलेले नाही. त्यामुळे ऑनलाईन धान्य वितरणात अडचणी येत आहे. पूर्वी जिल्ह्यात 16 हजार मे. टन धान्य वितरीत केले जात होते. परंतु आता फक्त 9 हजार मे. टन धान्य वितरीत करावे लागत आहे. जिल्ह्यात ऑनलाईन धान्य वितरण प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणात धान्याची बचत होत आहे. असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यंवशी यांनी बैठकीत दिली. त्याचबरोबर धान्य वितरणासंबंधी तक्रारींची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली असून यापुढे नागरीकांना वितरणासबंधीच्या तक्रारी 9307592572 या व्हॅटसॲप क्रमांकावर पाठविता येणार आहे. वितरणासंबंधीच्या तक्रारींसाठी नागरीकांना तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून अर्जाद्वारे आपल्या अडीअडचणी मांडाव्या लागतात. यामध्ये नागरीकांचा वेळ वाया जातो. तसेच याकीरता त्यांना गावाहून तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने अशा तक्रारी व अडीअडचणी सोडविण्यासाठी यापुढे व्हॅटसॲपची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. नागरीकांनी या क्रमाकांवर तक्रारी मांडल्यास या तक्रारींचे तात्काळ निवारण पुरवठा विभागामार्फत करण्यात येणार आहे.