<
शासकीय रक्कम ३३ रुपये तर मागणी होत आहे १०० रुपयांची
जामनेर-(चेतन निंबोळकर)- जिल्ह्यातील नागरिकांचे जातीचे दाखले, नॉन क्रीमीलीयर, डोमेसिअल-नँशनलिटी, उत्पन्नाचे दाखले, तसेच इतर शालेय उपयोगी दाखले, आदी दाखल्यांची गरज लक्षात घेत शासनाने ठेकेदारांच्या माध्यमातून तहसील कार्यालय आवारात सेतू सुविधा केंद्र सुरू केली. मात्र ही सेवा सामान्य नागरिकांच्या सोयी करीता सुरू केली की, त्यांना लुटण्या करीता ? अशी पदोपदी जाणीव करणारी घटना जामनेर तहसील कार्यालयात सेतु सुविधा केंद्रावर घडत असल्याने हे केंद्र सेतू सुविधा केंद्र नसून, लूटमार केंद्र बनले आहे असे म्हणण्याची सामान्य माणसाला वेळ येत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, जामनेर तहसील कार्यालयात नागरिकांना विनाकटकट शासकीय दाखले उपलब्ध करण्यासाठी येथील तहसील कार्यालय आवारात सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. परंतु येथे दाखले देण्यासाठी तिप्पट ते चौपट दर आकरले जात असून त्यातून सामान्य नागरिकांची लूट केली जात आहे. सेवेपेक्षा मेवा मिळविण्याचा उद्देश असल्याने एका दाखल्यासाठी शासकीय रकमेच्या तिनपट पैसे आकारून सामान्य नागरिकांची सर्रासपणे लुट होत असल्याचे दिसून आले आहे. तसेच सेतू सुविधा केंद्राची शासकीय पावती न देता त्यांना पावतीचा टोकन क्रमांक तोंडी सांगून पावती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने येथील तहसील कार्यालयातील कर्मचारी व सेतू सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांमध्ये कुठंतरी आर्थिक पाणी मुरण्याचं चित्र स्पष्ट होत आहे. ठेकेदाराच्या माध्यमातून जामनेर तहसील कार्यालयात सेतू केंद्र सुरू आहे. मात्र, तहसीलदारांचे याकडे दुर्लक्ष असल्याने सेतू सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांसह ठेकेदाराचेही चांगलेच फावले आहे. मिळेल त्या मार्गाने नागरिकांची आर्थिक लूट करण्याचे सत्र येथे सुरू आहे. जर कोणी तहसील विभागातील कर्मचार्यांकडे तक्रार केल्यावर ते केवळ दिखाव्यासाठी सेतू कर्मचाऱ्यांना रागवून विषय सोडून देतात. मात्र, सर्वसामान्यांची लूट होत आहे. या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. तसेच अशी परिस्थिती सर्विकडेच असल्याचे देखील नागरिकांनी सत्यमेव जयते कडेे सांगितले आहे.