<
बाली येथे शैक्षणिक व सांस्कृतिक परिषदेत राज्यातील ३० उपक्रमशील शिक्षकांचा सहभाग
कसारा/ठाणे – (प्रतिनीधी)- महाराष्ट्र राज्यातील ३० उपक्रमशील शिक्षक, मुख्याध्यापक व नृत्य कलाकार विद्यार्थ्यांनी नुकतेच इंडोनेशियातील बाली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक परिषदेत आपले विविध कौशल्य दाखवून देशाचे प्रतिनिधीत्व केले. राज्यातील शिक्षकांनी १९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान इंडोनेशियातील वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालये, आणि शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन इंडोनेशियातील अध्यापन पद्धती समजून घेतली. तसेच आपल्याकडील शैक्षणिक पद्धती व विचारांचे आदान प्रदान केले. यात शहापूर तालुक्यातील कसारा जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा विकास हिवरे यांनी इतर आठ शिक्षकांप्रमाणेच गणित या विषयावर प्रभावी प्रेझेंटेशन केले. यात मनिषा हिवरे यांनी नऊ शिक्षकांमध्ये अतिउत्तम सादरीकरण केल्यामुळे त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. यामुळे मनिषा हिवरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करून कौतुक केले जात आहे. या परिषदेला राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रमोद पाटील, प्रगती पाटील त्याचप्रमाणे कोल्हापूर विभागाचे संचालक मारुती गोंधळी, म.राज्य मुख्याध्यापक संघाचे सहसचिव ज्ञानेश्वर म्हात्रे, सिने कलाकार स्वप्निल फडके, ठाणे जि.प. मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत पवार आदी मान्यवर भारताच्या वतीने उपस्थित होते.