<
जळगाव, दि. 9 :- दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगिण सक्षमीकरणासाठी केंद्र शासनाने दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 कायदा पारित केलेला आहे. या कायद्यान्वये शारिरीक दोष, व्यंग असणाऱ्या 6 वर्षाखालील बालकांचे शारिरिक, मानसिक व शैक्षणिक पुनर्वसन होण्याच्या दृष्टीने जिल्हा दिव्यांग पुनर्वन केंद्र, जळगाव यांच्यामार्फत दिव्यांग बालकांचे पुनर्वसन होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. त्याअंतर्गत विविध थेरेपी सेवा, शस्त्रक्रिया, थेरपी प्रशिक्षण, शैक्षणिक संधी व विकास याबाबत मार्गदर्शन तसेच सेवा/सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 0 ते 6 वयोगटातील गतीमंद, मतीमंद, स्वमग्न, वाचा दोष, कर्णदोष, दृष्टीदोष, शारिरीक दोष व व्यंग तसेच मानसिक विकासात्मक बाधा असलेल्या बालकांच्या पालकांनी नावे नोंदविणे प्रस्तावित आहे. नोंदणी झालेल्या बालकांची तज्ञांमार्फत वैद्यकीय तपासणी व विकासातील विलंबांचे मुल्यामापन करून त्यांना गरजेनुरूप थेरेपी तसेच सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील . तरी जिल्ह्यातील शारिरीक दोष, व्यंग असणाऱ्या बालकांच्या पालकांनी आपल्या मुलांची नावे नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर, महाबळ रोड, जळगाव या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक 0257-2260528 वर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.