<
जळगाव(प्रतिनीधी)- येथील जिल्हा पोलिस दलात पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे यांनी आपल्या ४०व्या वाढदिवशी ४० किलोमीटर स्केटिंग करून विक्रम केलेला आहे. आणि असा विक्रम करणारे ते देशातील पहिले पोलीस ठरलेले आहेत. नियमित व्यायाम आणि सराव केल्यास पोलीस हा चाळीसाव्या वर्षीदेखील फिट राहू शकतो. ही प्रेरणा देशातील सर्व पोलिसांना विनोद अहिरे यांनी दिलेली आहे. म्हणून त्यांच्या या कार्याने प्रभावित होऊन अमळनेर येथील बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री प्रकाश बोरसे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह विनोद अहिरे यांचा शाल श्रीफळ व२१ हजार रुपये रोख देऊन त्यांचा सत्कार केला. सत्कार प्रसंगी श्री बोरसे म्हणाले की सहसा समाजामध्ये असा समज आहे की पोलीस खात्यात भरती झाल्यावर पोलीस स्थूल होऊन जातात त्यांचे पोट सुटून जाते ते काही अंतर देखील राहू शकत नाही, असा समज समाजामध्ये बहुतांशी पोलिसांच्या बाबतीत असतो परंतु पोलीस विनोद अहिरे यांनी आपल्या विक्रमा द्वारे दाखवून दिले आहेत की, पोलीस हा ४०व्या वर्षी देखील फिट राहू शकतो. आणि चाळीस किलो मीटर स्केटिंग देखील करू शकतो, सत्काराला उत्तर देताना विनोद अहिरे म्हणाले की, संकटांमुळे कोणी संपत नाही तर त्यातून एका जिद्दीचा जन्म होत असतो. जीवनातील प्रत्येक वादळ आपल्याला संपवण्यासाठी येते असं नाही तर ते आपल्या क्षमतांची परीक्षा घेण्यासाठी येत असते. म्हणून संकटांवर असं काही तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे, आणि हरलो तरीही इतिहासच घडला पाहिजे. आणि सत्य हे जास्त दिवस लपून राहत नाही ते एक दिवस समोर येतेच, माझे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांच्या प्रेरणेने मी आज हा विक्रम करू शकलो. बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरसे यांच्या भ्रमणध्वनीवर फोन करून अहिरे यांचे कामगिरीबद्दल अभिनंदन केले. सदर प्रसंगी बहुजन रयत परिषदेचे असंख्य कार्यकर्त्यांसह पदाधिकारी पत्रकार संजय मरसाळे, पत्रकार सुरेश कांबळे, डी बी खरात, मुख्याध्यापक कधरे सर, अनिल मरसाळे, मनोज बोरसे, सागर अंभोरे, समाधान शिंदे, गुलाब बोरसे यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण सपकाळे, नरेश बागडे, मुकुंद सपकाळे विनोद देशमुख प्रवीण पाटील, फारुक शेख, दिलीप सपकाळे, आदी मान्यवर उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम हा पॅंथर स्पोर्ट्स क्लब जळगाव च्या वतीने स्केटिंग खेळाडू व त्यांचे पालक यांनी जळगाव येथील बहिणाबाई गार्डन येथे दिनांक ०१/१२/१९ रोजी आयोजित केला होता.