<
जळगाव दि.१२ (प्रतिनिधी) – ग्रामीण संस्कृतीशी नाळ जुळलेले प्रशांत तिवारी यांनी रेखाटलेली चित्रे ही ग्रामीण संस्कृतीसह निसर्गाचे दर्शन घडविते. मोठ्याभाऊंच्या सहवासात आधी शिल्पकार, त्यानंतर चित्रकार असा प्रवास तिवारी यांचा असुन त्यांच्या मेहनतीचे हे फळ आहे. असे गौरवोद्गार जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी काढले.
जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या जन्मदिनानिमित्त भाऊंच्या उद्यानात आयोजित ‘हॉलिडे वर्क’ चित्रप्रदर्शनाचे उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी चोपडा येथील ललित कला महाविद्यालयाचे प्राचार्य राजु महाजन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, आनंद गुप्ते, गिमी फरहाद, प्रशांत तिवारी, प्रियंका तिवारी उपस्थित होते. यावेळी जैन इरिगेशनच्या कलाविभागाचे व्हाईस प्रेसिडेंट विकास मल्हारा, मीडिया विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी, ज्येष्ठ छायाचित्रकार ईश्वर राणा, विजय जैन, जगदीश चावला, आनंद पाटील, यांच्यासह कलाविभागातील सर्व सहकारी उपस्थित होते. प्रशांत तिवारी यांचे मेव्हुणे मुकेश दुबे, वैशाली दुबे, नवल तिवारी, निशा तिवारी व कुटुंबातील सदस्य उपस्थितीत होते. प्राचार्य राजु महाजन यांनी श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्यासह जैन उद्योग समूह कलावंतांच्या पाठीशी असल्याने त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळते. या दातृत्वातून अनेक प्रतिभावंत घडले असुन जगाच्या पाठिवर खान्देशचे नाव पोहचले असल्याचे ते म्हणाले. आनंद गुप्ते यांनी प्रदर्शनाबद्दल आपले विचार मांडले. आपण जिथे राहतो, तो परिसर बघतो त्याचे आपल्या मनावर प्रतिबिंब उमटते. त्यातुन चित्रांची निर्मिती होते. हा भाव या ग्रामीण, निसर्ग चित्रांतून प्रशांत तिवारी यांनी वॉटर कलरमध्ये साकारला असुन तो अप्रतिम असल्याचे आनंद गुप्ते म्हणाले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले. तसेच कलाक्षेत्रातील जाणकारांची ही उपस्थिती होती. ‘हॉलिडे वर्क’ चित्रप्रदर्शनात ४६ चित्रे असून १९ डिसेंबर पर्यंत सर्वांसाठी खुले असणार असुन रसिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.