<
जळगांव(प्रतिनीधी)- सकाळी सकाळी दारात सहज दिसणारं वृत्तपत्र किरकोळ नसतच, त्यामागे राबत असतात कितीतरी हात अन् मेंदू त्यामागे असते वृत्तपत्र समूहाच्या समर्पणाची प्रतिष्ठा. संपादकाची हातोटी, वार्ताहराची हुशारी, जाहिरातदाराची चिकाटी, मध्यरात्री पार्सलचे गठ्ठे बांधणाऱ्या पोरांपासून खेड्यापाड्यात पोहोचवणाऱ्या एस.टी.पर्यंत अन् स्टॅण्डवरच्या हमालापासून एजंट व्हाया सायकलवर पेपर टाकणाऱ्या पोऱ्यांपर्यंत कितीतरी हात झटत असतात अव्याहतपणे. अगदी ऊन, वारा, थंडी, पावसातसुद्धा. म्हणुन वाटतं सकाळी सकाळी दारात दिसणारं वृत्तपत्र किरकोळ नसतच. त्याच्यात सामावलेली असते विद्येची सात्वीकता, क्रांतीची प्रखरता. तुमच्या आमच्या जगण्याची सोशीकता अन् आगतिकता, प्रश्नांची दाहकता, व्यवस्थेची दांभीकता. आयुष्यभर सरळ वाटेनं चालणाऱ्या सामान्य जीवाची असते एकच आकांक्षा. म्हणुनच वाटतं की सकाळी सकाळी दारात सहज दिसणारं वृत्तपत्र किरकोळ नसतच. कधी कधी आपलीच नजर ठरते किरकोळ अन् चार दोन रुपयाच्या नाण्यांशी आपण करतो तुलना. पण विद्येला तोलणारं नाणं अजूनतरी कुठल्या टांकसाळीत निर्माण नाही झालं. म्हणुनच वाटतं सकाळी सकाळी दारात सहज दिसणारं वृत्तपत्र किरकोळ नसतच.
चेतन निंबोळकर (सत्यमेव जयते न्युज विशेष प्रतिनिधी)