<
पाळधी/धरणगांव(प्रतिनिधी)- भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचा वाढदिवस (२३ डिसेंबर) राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. देशभरामध्ये आज शेतकरी म्हणजेच आपला अन्नदाता करत असलेल्या मेहनतीला कृतज्ञता व्यक्त केली जाते. शेतकऱ्यांच्या हितासाठी चौधरी चरण सिंग यांनी भरीव कामगिरी केली आहे. शेतकऱ्यांकरिता केलेल्या भरीव कार्याचे स्मरण व्हावे व सर्व शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून त्यांचा जन्म दिवस २३ डिसेंबर हा शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. याच अनुषंगाने पाळधी ता. धरणगांव येथे सुर्या फाऊंडेशन संचलित नोबल इंटरनॅशनल स्कूल येथे २३ रोजी जिल्हा कृषी उपसंचालक अनिल भोकरे व धरणगांव तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी यांचा मार्गदर्शनाखाली शेतकर्यांच्या विविध विषयांवर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नोबल स्कूलच्या संचालिका अर्चना सुर्यवंशी व प्रशांत सूर्यवंशी यांनी केले आहे. या दिवशी शेतकऱ्यांना विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजना, उपक्रम याची माहिती आणि लाभ घेण्याच्या कार्यपध्दती या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.