<
कष्टकरी शेतकर्याचा कृतज्ञता म्हणून शेतकरी दिनानिमित्त शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन केला गौरव
पाळधी/ जळगांव(प्रतिनीधी)- देश आपला कृषीप्रधान, शेतकरी दिनाच्या निमित्ताने आज आवर्जून करूया बळीराजाचा सन्मान. याच वाक्याला अनुसरण भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचा वाढदिवस (२३ डिसेंबर) राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. देशभरामध्ये आज शेतकरी म्हणजेच आपला अन्नदाता करत असलेल्या मेहनतीला कृतज्ञता व्यक्त केली जाते. शेतकऱ्यांच्या हितासाठी चौधरी चरण सिंग यांनी भरीव कामगिरी केली आहे. शेतकऱ्यांकरिता केलेल्या भरीव कार्याचे स्मरण व्हावे व सर्व शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून त्यांचा जन्म दिवस २३ डिसेंबर हा शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येतो, याच अनुषंगाने पाळधी ता. धरणगांव येथे सुर्या फाऊंडेशन संचलित नोबल इंटरनॅशनल स्कूल येथे आज रोजी ” गौरव शेतकरी भुमीपुत्रांचा” या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. या गौरव सोहळ्यामध्ये आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग राबवून आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या परिसरातील प्रगतशील शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सहकार राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार गुलाबराव पाटील यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून धरणगाव पंचायत समितीचे सभापती मुकुंद नन्नवरे, चांदसर गावाचे सरपंच सचिन पवार, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, राशी सिड्स चे गोपाल पाटील, अखिलेश प्रतापसिंह, शाळेचे आश्रयदाते भगवान सुर्यवंशी, शाळेच्या अध्यक्षा अर्चना सुर्यवंशी व प्रशांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन बैलगाडीचे पुजन करून करण्यात आले. भारत हा शेतीप्रधान देश आहे. तसेच ‘शेती’ हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी शेती पिकवून संपूर्ण देशातील जनतेची भूक भागवतो. शेतकऱ्याला सन्मानाने ‘बळीराजा’ म्हटले जाते. प्रत्येक भारतीयाने समाजातील प्रत्येक घटकाने शेतकऱ्यांप्रती किमान कृतज्ञतेची भावना ठेवणे गरजेचे आहे. असे ते यावेळी बोलताना म्हणाले. शाळेतील विद्यार्थ्यांनी शेतकर्यांच्या जिवनावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे उपस्थितांची मने जिंकली.यावेळी परिसरातील शेतकर्यांसह ग्रामस्थ ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक योगेश करंदीकर यांच्या सह गुणवंत पवार, सतिश पाटील, राधिका उपाध्याय, पायल सोमानी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.