<
जळगाव.दि.२०- आर्थिक गणनेचे काम तालुका पातळीवर तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच अन्य तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांच्या आणि गाव पातळीवर मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्याशी समन्वय ठेवून त्यांच्या सहकार्याने लवकरात लवकर पूर्ण करावे असे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी आज जिल्हाधिकारी यांच्या सभागृहात आयोजित सातवी आर्थिक गणना वर्ष 2019-2020 च्या जिल्हास्तरीय समन्वय समिती सभेत केले.याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा सांख्यिकी अधिकारी प्रमोदराव पाटील, कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अर्थशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.आर.एल.शिंदे, सामुहिक सेवा केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक उत्कर्ष वाणी, राहुल देवरे, अभिनंदन पाटील, क्षेत्रीय कार्यविभाग, राष्ट्रीय नमुना पाहणी संघटनेचे प्रतिनिधी सी.एन.रत्नपारखी, जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, समन्वय समिती सदस्यांचे प्रतिनिधी मोठ्या संखेने उपस्थित होते.प्रभारी जिल्हाधिकारी गाडीलकर पुढे म्हणाले की, आर्थिक गणनेच्या कामात स्थानिक शासकीय यंत्रणेशिवाय विविध स्वयंसेवी संस्था, यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी विशेषत: डी.एड, बी.एड तसेच समाज कार्य महाविद्यायातील विद्यार्थ्यांचा सहभाग व सहकार्य घ्यावे. आर्थिक गणनेच्या कामाचे जिल्हा पातळीवरून जिल्हा सांख्यिकी अधिकारी प्रमोदराव पाटील यांनी नियंत्रण ठेवावे. आर्थिक गणनेच्या कामात गाव ते जिल्हा पातळीपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून सर्वातोपरी सहकार्य केले जाईल असेही शेवटी श्री.गाडीकर यांनी सांगितले.जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या सातवी आर्थिक गणना 2019-2020 च्या बैठकीच्या शेवटी बैठकीस जिल्ह्यातील उपस्थित सर्व नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांकडून गतवर्षाच्या व चालु वर्षाच्या वृक्षारोपण उदिष्ट्ये आणि प्रत्यक्षात जगलेली वृक्षे याचा आढावा घेवून लागवड झालेल्या सर्व वृक्षांना जगवा आणि वाढवा त्यासाठी सर्व सामाजिक संस्था, वृक्षप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांचे सहकार्य घ्यावे. अशा सूचना सर्व मुख्याधिकाऱ्यांना दिल्यात.