<
जळगाव- अन्न सुरक्षा मानद कायदा 2006 व नियम 2011 अंतर्गत अन्न विक्री, साठा, वितरण व उत्पादक यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या अन्न व्यावसायिकांनी परवाना / नोंदणी केली नसेल, त्यांनी foodlicensing.fssai.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करुन नोंदणी करावी. असे आवाहन यो. को. बेडकुळे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. त्याचबरोबर अन्न व औषध प्रशासन, जळगाव या विभागामार्फत 1 एप्रिल पासून 31 डिसेंबर, 2019 अखेर जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या कारवाई अंतर्गत 17 दुधाचे, 19 खाद्यतेलाचे, 14 मिठाई/खवा, 4 फळांचे व इतर अन्नपदार्थांचे 49 असे एकूण 103 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. त्यापैकी 7 अन्न नमुने कमी दर्जाचे तर 76 नमुने प्रमाणित /चांगल्या प्रतीचे असल्याचे अन्न विश्लेषक प्रयोग शाळेमार्फत घोषित केलेले आहे. अन्न प्रदार्थाचे विश्लेषणात कमी दर्जाचे आढळून आलेल्या नमुन्यांप्रकरणी नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. या कालावधीत प्रतिबंधित अन्न पदार्थांबाबत 9 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या असून 78 लाखांचा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून याबाबत अन्न व औषध प्रशासनामार्फत 23 प्रकरणी विविध न्यायालयात खटले दाखल करण्यात आले असल्याचेही श्री. बेंडकुळे यांनी कळविले आहे. अद्यापही ज्या अन्न व्यावसायिक धारकांनी अन्न सुरक्षा मानद कायदा 2006 व नियम 2011 अंतर्गत अन्न विक्री, साठा, वितरण व उत्पादक नोंदणी केली नसेल त्यांनी तात्काळ विभागाच्या foodlicensing.fssai.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करुन नोंदणी करुन घ्यावी व पुढील कारवाई टाळावी. असे आवाहनही श्री. बेंडकुळे यांनी केले आहे.