<
सफाई कामगारांच्या आरोग्याच्या बाबतीत अधिकार्यांनी लावलाय काळा चष्मा
जळगांव(चेतन निंबोळकर)- शहराला वैभव प्राप्त करून देण्याचे आश्वासने लोकप्रतिनिधी व अधिकारी अनेक वेळा करत असतात. परंतु सफाई कामगारांचे राहणीमान सुधारावे याकडे मात्र कोणीच लक्ष देत नाही. महानगरपालिका स्वच्छता विभागातील कचरावेचक आणि घंटागाडी कर्मचारी यांच्या आरोग्याच्या बाबतीत पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. महापालिका हद्दीतील घरोघरी, गल्लीबोळात घंटागाडी आपणास कचरा गोळा करताना दिसून येतात, पण स्वच्छता विभागातील या कचरा गोळा करून परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य मात्र धोक्यात आहे. सकाळी लवकर उठून हे कर्मचारी घंटागाडीसोबत कचरा, घाण गोळा करतात. कोणतेही हातमोजे, पायात रबरी बूट नसताना हे कर्मचारी ऊन-पावसात राबताना दिसून येतात. काम करताना घाण हातांच्या नखात जाते, त्याच हातांनी जेवण केल्याने अनेक दुर्धर संसर्गजन्य रोगाची लागण होण्याची शक्यता असते. दिवसाचे ८ ते १२ तास श्वास घेण्यासही त्रास होत असलेल्या कचऱ्यात राहिल्यामुळेच त्यांना व्यसने देखील लागली आहेत. याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कचरा हाताने वर्गीकरण केल्यामुळे सफाई कामगारांच्या हाताला, पायाला जखमा व खरूज होणे व खाज सुटणे तसेच घाणीच्या वासामुळे श्वसनाचे विकार जडले आहेत. त्यामुळे वयाच्या ४५ ते ५५ व्या वर्षीच सफाई कामगारांना भयंकर आजाराची लागण झाल्याचे दिसून येते. आपल्या परिसरातील साफसफाई राखणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र सुरक्षेच्या दृष्टीने हातमोजे, टोपल्या व इतर अनेक प्रकारची सुविधा साधने महापालिकेने, तसेच संबंधित ठेकेदाराकडून देणे बंधनकारक असताना, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला घातक असतानाही कर्मचाऱ्यांच्या जिवाशी खेळले जात आहे. या सफाई कामगारांना केरकचरा उचलताना कोणतीही सुविधा साधने नसताना काम करावे लागत आहे. सत्यमेव जयते ने काही सफाई कामगारांशी संपर्क साधला असता नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, की आमचे वरिष्ठ अधिकारी आमच्याकडे काही लक्ष देत नाहीत. आमच्या आरोग्याच्या दृष्टीने आमच्या सोई सुविधांकडे लक्ष देण गरजेचं आहे असं ही ते यावेळी म्हणाले.