<
संचालक (मानव संसाधन) यांनी घेतला १२ जिल्ह्यातील कामाचा आढावा
कल्याण (प्रतिनिधी) दि.१९ – “मानव संसाधन विभागाची बहुतांश कामे ही कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजांशी निगडीत असतात. त्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रभाव महावितरणच्या कार्यक्षमतेवर, कार्यपद्धतीवर होत असतो. त्यामुळे मानव संसाधन विभागाने कर्मचाऱ्यांचे विविध विषय, अडचणी, तक्रारी आदी प्रकरणे संवेदनशील पद्धतीने हाताळावीत. या कामाकरता विशिष्ट कालमर्यादा आखून घ्यावी.” असे स्पष्ट आदेश महावितरणचे संचालक (मानव संसाधन) ब्रिगेडियर पवन कुमार गंजू यांनी कोकण प्रादेशिक विभाग अंतर्गत येणाऱ्या १२ जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दिले आहे.
महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभाग अंतर्गत मानव संसाधन विभागात कार्यरत अधिकाऱ्यांच्या कल्याण येथील आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक विजयकुमार काळम पाटील (भाप्रसे) होते. तर मुख्य अभियंता अंकुश नाळे (गुणवत्ता नियंत्रण) यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी ब्रिगेडियर गंजू म्हणाले, “कर्मचारी व अधिकारी यांच्याशी संबंधित वरिष्ठ वेतनश्रेणी, विभागीय चौकशी, निलंबन आदी प्रकरणे विहित मुदतीत पूर्ण करा. विविध प्रकरणात दोषी कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी किमान कालावधीत पूर्ण करा. कर्मचाऱ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी विषयक प्रकरणे सातत्याने पाठपुरावा करून पूर्ण करा. कर्तव्यावर असताना अपघात झालेल्या कर्मचारी, आजारी कर्मचारी यांची मेडिक्लेम प्रकरणे तत्काळ सोडवा. अनुकंपा तत्त्वावरील भरती करताना संवेदनशीलपणे विचार करून अधिकचा वेळ घेऊ नका. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत द्या.”सह व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार काळम पाटील (भाप्रसे) म्हणाले, “कर्मचाऱ्यांच्या गोपनीय अहवालासंबंधी सर्व प्रकरणे एक महिन्यात पूर्ण करा. केलेल्या सर्व कामाची नोंद रजिस्टरमध्ये ठेवा. कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातील तक्रारी वेळेत सोडवा. यातील कामे अपूर्ण राहिल्यास फील्ड भेटी दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.”यावेळी अधीक्षक अभियंता ज्ञानेश कुलकर्णी, सुनील काकडे, विजय मोरे, विधी सल्लागार चित्रा भेदी, सहा. महाव्यवस्थापक (मा.सं.) सुनील पाठक, हविशा जगताप, धैर्यशील गायकवाड, महेश बुरंगे तसेच महावितरणचे इतर सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सब स्टेशनची पाहणी
या बैठकी पूर्वी संचालक (मानव संसाधन) ब्रिगेडियर गंजू व सह व्यवस्थापकीय संचालक काळम पाटील (भाप्रसे) यांनी एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत काम सुरू असणाऱ्या पायोनियर स्वीचिंग सब स्टेशनची पाहणी केली. २.६५ कोटी प्रकल्प निधीतून काम अंतिम टप्प्यात असलेल्या मेट्रो मॉल जवळील २२/२२ केव्ही स्वीचिंग सब स्टेशनमुळे कल्याण (पूर्व), कोळसेवाडी, लोकग्राम, लोकधारा, मेट्रो मॉल आदी परिसरातील सुमारे ४० हजार ग्राहकांना लाभ मिळणार आहे.