<
जळगाव : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, जळगाव आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने अॅड.एस.ए.बाहेती महाविद्यालय जळगाव येथे जोडीदाराची विवेकी निवड युवा संकल्प परिषद ही रविवार दि. १२ जानेवारी रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत घेण्यात येत आहे, अशी माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा.डॉ.सत्यजित साळवे यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डी.एस.कट्यारे, बाहेती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल लोहार यांची प्रमुख उपस्थिती होती. भावी जोडीदाराची विवेकी पद्धतीने निवड कशी करावी याबाबतची माहिती व मार्गदर्शन परिषदेत करण्यात येणार आहे. परिषदेचे उद्घाटन प्र-कुलगुरू डॉ.पी.पी.माहुलीकर यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होणार असून यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील हे आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून अंनिसचे राज्य सरचिटणीस डॉ.ठकसेन गोराणे(नाशिक), विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा.डॉ.सत्यजित साळवे, क्रीडा रसिक एज्युकेशन संस्थेचे सचिव रोहन बाहेती, बाहेती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल लोहार हे उपस्थित राहतील. यानंतर जोडीदाराची विवेकी निवड संकल्पना याविषयी होणाऱ्या परिसंवादात मुंबई येथील सचिन थिटे, निशा फडतरे, पनवेल येथील महेंद्र नाईक हे माहिती देणार आहेत. दुपारच्या सत्रात जोडीदाराची विवेकी निवड करणा-या दीक्षा काळे -आनंद कोन्नुर, मिनाक्षी कांबळे -विश्वजीत चौधरी, राहुल जगताप या तीन जोडप्यांची कोल्हापूर येथील स्वाती कृष्णात ह्या मुलाखत घेणार आहेत. त्यानंतर पनवेल येथील आरती नाईक आणि सचिन थिटे हे युवा संकल्प अभियानाविषयी सांगतील. समारोपाला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते शेखर सोनाळकर, वासंती दिघे असून यावेळी राज्य पदाधिकारी डॉ. प्रदीप जोशी हे जोडीदाराची विवेकी निवड आणि मानसिक आरोग्य याविषयी मार्गदर्शन करतील. परिषदेला जळगाव, धुळे, नंदुरबार येथील विविध महाविद्यालयातील सुमारे ३०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांनी परिषदेला सकाळी ८.३० वाजता नावनोंदणीवेळी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. परिषद यशस्वीतेसाठी अॅड.एस.ए.बाहेती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल लोहार व समन्वयक डॉ.खेमराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयातील विविध समित्या कार्यरत आहे. पत्रकार परिषदेला सहसमन्वयक विश्वजीत चौधरी, शहराध्यक्ष अश्फाक पिंजारी उपस्थित होते.
काय आहे हे अभियान ?
दि. १२ जानेवारी राष्ट्रीय युवा दिन आणि १४ फेब्रुवारी तरुणाईला भुरळ पाडणारा आंतरराष्ट्रीय प्रेम दिन या दोन दिवसांचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र अंनिसच्या जातीअंत विभाग व राज्य युवा विभाग यांच्या पुढाकाराने जोडीदाराची विवेकी निवड युवा संकल्प अभियान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे राबविण्यात येत आहे. या ३४ दिवसांच्या कालावधीत २५ ते ३० जिल्ह्यांमध्ये ५० ते ६० महाविद्यालयात हे अभियान राज्यभर राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा उद्घाटन सोहळा १२जानेवारी रविवार रोजी जळगावात होत आहे.
जोडीदाराची विवेकी निवड म्हणजे काय?
विवेकी विचार रुजविण्याचा हा एक कृतिशील प्रयोग आहे. जातमुक्त समाज व राष्ट्र निर्माण करण्यासाठी एक नवी वाटचाल होय. अभियानात जोडीदाराची विवेकी निवड कां करायची? कशी करायची? त्याची गरज काय आहे? अॅरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज, परिचयोत्तर निवड म्हणजे काय तसेच हुंडा, पारंपरिक कुंडली नाकारुन आधुनिक काळाचा स्विकार कसा करावा, सहजीवन, लिंगभाव विषमता, लिंगसमभाव, जोडीदाराच्या नात्यातील सुरेल संवाद यासाठी प्रशिक्षणाची गरज का असते यावर चर्चा होणार आहे. या परिषदेत पालकांसोबत देखील संवाद साधला जाणार आहे. तसेच या माध्यमातून उपक्रमांद्वारे यशस्वी व सुखी तीन ते चार जोडप्यांची मुलाखत घेतली जाणार आहे. त्यांचे अनुभव ऐकणे प्रेरणादायी असते. परिषदेच्या ठिकाणी वेगवेगळ्या आकाराच्या आकर्षित करणारे पोस्टर लावण्यात येणार आहे. तसेच सेल्फी कॉर्नर देखील आहेत. स्वत:चा जोडीदार स्वत:निवडू आणि स्वावलंबी राहु हा उद्देश या अभियानाचा आहे. या परिषदेसाठी मुंबई येथील सचिन थिटे, निशा फडतरे, पनवेल येथुन महेंद्र नाईक व आरती नाईक तसेच कोल्हापूर येथुन स्वाती कृष्णात मार्गदर्शक म्हणून येत आहेत.