<
मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी गावावर शोककळा
मुक्ताईनगर(प्रतिनीधी)- तालुक्यातील टाकळी येथील बालकाचा पतंगाच्या मांजाने गळा कापला जाऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मध्यप्रदेशातील शहापूर तालुक्यातील रायगाव निमगाव रस्त्यावर मोटारसायकल वरून जात असताना घडली. निखिल जितेंद्र चव्हाण (वय ८) असे मयत बालकाचे नाव आहे. तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी जितेंद्र चव्हाण यांची सासरवाडी मध्यप्रदेशातील शहापूर गावाजवळील खारी येथे आहे. मध्यप्रदेशातील लोखंड्या यात्रा ही बंजारा समाजा अत्यंत महत्वाची यात्रा मानली जाते. याच यात्रेला जितेंद्र चव्हाण हे पत्नी सुमित्रा व मुलगा निखिल सह सासरवाडीला खारी येथे गेले होते. ते खारी येथून मोटारसायकल ने पत्नी व मुलगा निखिल समवेत लोखंड्या यात्रेच्या दिशेने सायंकाळ च्या वेळेस निघालेले होते. शहापूर तालुक्यातील रायगाव निमगाव या गावाच्या दरम्यान जात असताना निखिल ला गळ्याला काहीतरी लागल्याचे लक्षात आल्याने त्याने हात लावला असता भयंकर रक्तस्त्राव होत असल्याचे दिसले. हे पाहून वडील जितेंद्र यांनी पतंगाच्या मांजाने गळा चिरल्याचे पाहिले व त्याला तात्काळ फोफणार येथील दवाखान्यात नेले असता निखिल ला बुऱ्हाणपूर जिल्हा रुग्णालयात नेण्याच्या सूचना करण्यात आली .तेथून बुऱ्हाणपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले असता तेथे निखिल ला मृत घोषित करण्यात आले. मातेने व पित्याने एकच हंबरडा फोडला यात्रेतील देवदर्शना नंतर मुलाच्या खेळणे व पाळण्याच्या हौशीला पुरविले जाईल असा मोटारसायकल वर तिघांचा बेत सुरू होता, अगदी हसत हसत हे कुटुंब यात्रेच्या दिशेने निघालेले होते. मध्येच पतंगाचा मांजा काळा चा पंजा घेऊन निखिल ची वाट पहात आहे. याची तिघांना ही इवलीशी कल्पना नव्हती व होत्याचे नव्हते ते झाले अचानक कोसळलेल्या या काळाच्या घालाणे निखिल चा दुर्दैवी अंत झाला यामुळे माता पित्याने एकच हंबरडा फोडला होता हे दृश्य पाहून प्रत्येकाचे मन हेलावून जात होते. संक्रांतीच्या पर्वावर पतंगासाठी मांजाचा सर्रास वापर संक्रांतीच्या पर्वावर पतंग उडविण्याची अनेक राज्यात परंपरा आहे. आणि याच परंपरेला फास देत काचाच्या तुकड्यांनी माखलेल्या मांजाचा वापर अलीकडच्या काळात वाढला त्यामुळे अशा अपघाताच्या अनेक घटना घडू लागल्याने मांजावर निर्बंध आणण्यात आले मात्र आपल्या देशात ज्या गोष्टीवर निर्बंध आणले जातात त्या जास्तीचे पैसे देऊन विकत घेण्याची वृत्ती असल्याने हा मांजा देखील सर्रासपणे विक्री होत असतो .त्यामुळे आज ही निखिल ची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे स्वतः जनतेने पुढाकार घेऊन याचा वापर टाळणे अनिवार्य ठरते. म्हणजे भविष्यात कोण्या निष्पाप बाळाचा इतका करून अंत होणार नाही.